इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:24 AM2020-12-11T04:24:10+5:302020-12-11T04:24:10+5:30
मुंबई : लाॅकडाऊन लागू झाल्यापासून सातत्याने पेट्रोल-डिझेलची दरवाढ केली जात असल्याचा आरोप करीत शिवसेनेने गुरुवारी मुंबईभर निदर्शने केली. पेट्रोल, ...
मुंबई : लाॅकडाऊन लागू झाल्यापासून सातत्याने पेट्रोल-डिझेलची दरवाढ केली जात असल्याचा आरोप करीत शिवसेनेने गुरुवारी मुंबईभर निदर्शने केली. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या दरातील वाढीविरोधात शिवसैनिकांनी मुंबईतील प्रत्येक विभागात मोर्चे काढले. या वेळी दरवाढ मागे घेण्याच्या मागणीसोबतच केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
पेट्रोलची किंमत ९३ रुपयांवर तर डिझेलची ८० रुपयांवर गेली आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढत आहेत. या इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह स्थानिक विभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारविरोधात आंदोलन केले. ‘केंद्र सरकारचा गैरकारभार, पेट्रोल-डिझेल दरवाढीचा जनतेवर भार!’, ‘रद्द करा, रद्द करा, इंधन दरवाढ रद्द करा,’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. दादर, लालबाग, कुर्ला, बोरीवली, गोरेगाव, मालाड तसेच छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकासमोर निदर्शने करण्यात आली.
दादरच्या खोदादाद सर्कल येथे शिवसैनिकांनी रास्ता रोको केला. त्यामुळे परिसरात काही काळ वाहतूककोंडी झाली होती. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलकांना पांगवले. लालबाग परिसरातही काही काळ रास्ता रोको करण्यात आला. महिला शिवसैनिकांनी घरातील गॅस सिलिंडर रस्त्यावर आणून सरकारविरोधात संताप व्यक्त केला. याशिवाय कलिना, कुर्ला, मालाड रेल्वे स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, गोरेगाव स्थानक, बोरीवली रेल्वे स्थानकाबाहेरही आंदोलन करण्यात आले.