मुंबई: राज्यात आताच्या घडीला अयोध्या दौऱ्यावरून राजकारण तापताना पाहायला मिळत आहे. युवासेना नेते आणि पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यासंदर्भात शिवसेना भवनात एक बैठक पार पडली. यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याविषयी माहिती दिली. यावेळी संजय राऊतांनी विरोधकांचा समाचर घेत, घणाघाती टीका केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून भाजप महाविकास आघाडी सरकार पडण्याविषयी विविध तारखा देत आहेत. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास संजय राऊत यांनी यापूर्वी व्यक्त केला होता. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागावी, यासाठी तसे वातावरण निर्माण केले जात असल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली होती. यासंदर्भात पुन्हा भाष्य करताना संजय राऊतांनी भाजपसह विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे.
भीती हा शब्द आमच्या शब्दकोषात नाही
५० वर्षे शिवसेना वादळांशीच संघर्ष करत इथपर्यंत पोहचलेली आहे. आम्हाला वादळे नवीन नाहीत, वादळे परतून लावण्या इतकी आणि नवीन वादळ निर्माण करण्याची क्षमता व ताकद महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त शिवसेनेमध्येच आहे. शिवसेना आणि भीती या दोन शब्दांचा कधी मेळ बसत नाही. भीती हा शब्द आमच्या शब्दकोषात नाही, असे संजय राऊत यांनी नमूद केले.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी बोलताना, अयोध्या शिवसेनेसाठी नवीन नाही, ही आमची पायवाट आहे. गेली ३० वर्षे शिवसेना आणि अयोध्या यांचे एक नात निर्माण झालेले आहे. त्याच्यामुळे आम्हाला काय फार तयारी करावी लागणार नाही. प्रत्येक शिवसैनिक किंवा शिवसेनेचा पदाधिकारी, हा सतत अयोध्येत जात-येत आहे. मी स्वत: जातो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नसतानाही जाऊन आले आणि मुख्यमंत्री झाल्यावरही जाऊन आले. आदित्य ठाकरेदेखील अनेकदा जाऊन आलेले आहेत, दर्शन घेऊन आले आहेत, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.