Join us

संजय राऊत केंद्र सरकार अन् राज्यात वाद लावून देत आहेत; दीपक केसरकरांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 1:59 PM

शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई- उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर सेलिब्रेशन सुरू असल्याचं बोललं जातंय, मात्र इथं कुणीही उत्सव साजरा केला नाही. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा यासाठी आमचा बंड नव्हता. आमचा बंड आघाडीविरोधात होता. उद्धव ठाकरेंचं मन दुखावं हा हेतू नव्हता, असं शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी सांगितलं. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केलं. 

दीपक केसरकर यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला. आज महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे आहे की, संजय राऊत यांनी सकाळी ९ वाजता उठून एक पत्रकार परिषद घ्यायची. केंद्रावर टीका करायची आणि केंद्र व राज्यात वाद लावून द्यायचा असं सुरू आहे. मात्र महाराष्ट्राची प्रगती करायची असेल तर केंद्र व राज्य यात चांगले संबंध असावे लागतील. हीच आमची भूमिका आहे, असं दीपक केसरकर म्हणाले. 

महाराष्ट्रात जी आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत झाली त्यांच्यााविरोधात हे सगळं करण्यात आले. उद्धव ठाकरेंचे मन दुखवावे, अपमान व्हावा असा कुठलाही हेतू नव्हता. काँग्रेस-राष्ट्रवादीशी लढताना स्वकीयांशीही लढावं लागले. आम्ही दीड वर्ष झाले आपली नैसर्गिक युती आहे. ज्यांच्यासोबत आपण निवडणूक लढलो त्यासोबत आपण राहावं ही आमची भूमिका होती. वेळोवेळी आमदारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला गेला. संभ्रमावस्था निर्माण होईल अशी वक्तव्ये, बातम्या पसरवल्या गेल्या असंही दीपक केसरकर यांनी सांगितले. 

दरम्यान, आता जी युती होत आहे, ती महाराष्ट्राच्या जनेतेने निवडून दिलं त्यांची होत आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी पाठीत खंजीर खुपसल्याची भाषा करू नये. पाठीत कुणी खंजीर खुपसला असेल तर तो संजय राऊत यांच्यासारख्या लोकांनी खुपसला. त्यांनी चुकीचा सल्ला दिला. संजय राऊत स्वतः शिवसेनेत आहेत, मात्र निम्म काम राष्ट्रवादीचं करत असतात. त्यावेळी ते जनतेच्या पाठीत खंजीर खुपसत असतात, असही दीपक केसरकर म्हणाले.

सरकार २५ वर्षे टिकेल- देवेंद्र फडणवीस

काल दिवसभरात घडलेल्या अनेक घडामोडी आणि कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर रात्री सुप्रिम कोर्टाने बहुमत चाचणी नियोजित वेळेनुसार घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्यातील जनतेला संबोधित करत उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा पराभव झाला म्हणून आपण उन्माद करायचा नाही, असा सल्ला भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिला. ते म्हणाले की, अडीच वर्षांनंतर स्थापन होणारं सरकार २५ वर्षे टिकेल. या संपूर्ण लढाईत भाजपाच्या आमदारांची भूमिका महत्त्वाची होती. तसेच या संपूर्ण घटनाक्रमात निर्णायक भूमिका घेणाऱ्या शिंदे गटातील आमदारांचेही मी आभार मानतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :संजय राऊतउद्धव ठाकरेशिवसेनामहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ