मुंबई- राज्याच्या विधानसभेत आज बहुमत चाचणी घेण्यात आली आणि यात १६४ आमदारांच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे सरकार चाचणीत यशस्वी झालं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांची भाषणं झाली. पण या सगळ्यात अजित पवारांच्या तुफान फटकेबाजीची चर्चा झाली.अजित पवारांनी आपल्या अनोख्या शैलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बंडखोर आमदारांवर जोरदार फटकेबाजी केली. यावेळी शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांच्या व्हायरल डायलॉगची अजित पवारांनी देखील भुरळ पडली.
शहाजी बापू पाटील यांच्या 'काय झाडी, काय डोंगर' या डायलॉगचा उल्लेख करत अजित पवारांनी विधानसभेत जोरदार भाषण केलं. "ते शहाजी बापू तिथं काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल एकदम Ok Ok करत बसले", असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या विधानानंतर माध्यमांनी अधिवेशन संपल्यानंतर शहाजी बापूंशी संवाद साधला. त्यावर अजित पवारांनी मला खूप प्रेम दिलं. शरद पवारांनीही दिलं. त्यांच्यासोबत मी जीवनाचे ३५ वर्षे राजकारणात काम केलं.
मी अजित पवारांबद्दल कालही, आजही, उद्याही चांगलचं बोलणार असं शहाजी बापू यांनी सांगितलं. दादा, दादाच आहेत, आणि ते कायम दादाच राहतील. मी आयुष्यात शरद पवारांना देखील घाबरलो नाही. पण दोन माणसांना आयुष्यात घाबरतो, ते म्हणजे एक अजित पवार आणि दुसरे एकनाथ शिंदे. काही ठरवून घाबरत नाही, मात्र त्यांना बघून नैसर्गिकच घाबरायला होतं, असं शहाजी बापू यांनी सांगितलं.
दरम्यान, शिवसेनेत बंड केल्यावर एकनाथ शिंदे जेवढे प्रकाशझोतात आले, त्यापेक्षा अधिक शहाजीबापू आले ते त्यांच्या अस्सल सोलापुरी ग्रामीण ढंगातील संवादामुळे. बंडानंतर शिंदे यांच्या गटात गेेलेल्या काही मंत्री, आमदारांसह शहाजीबापू सध्या गुवाहाटीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये असताना त्यांनी कार्यकर्त्याशी साधलेल्या संवादानंतर ‘बापू’ राज्यात चांगलेच ट्रेंडमध्ये आले आहेत. बापूंच्या या संवादातून रचलेल्या या गाण्यानं सोशल मीडियाने दुष्काळग्रस्त सांगोल्याला देश-विदेशात पोहोचवलं आहे.