मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील नव्या सरकारची शक्तिपरीक्षा ४ जुलै रोजी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्ताने होणार आहे. तत्पूर्वी ३ जुलैला म्हणजेच उद्या विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. याचपार्श्वभूमीवर गोव्यात असणारे शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार आज मुंबईत दाखल होणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ गुरुवारी सायंकाळी घेतली होती. त्यानंतर २ आणि ३ जुलै रोजी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. तथापि, आता हे अधिवेशन ३ आणि ४ जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे सध्या गोव्यात मुक्कामी असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार आज मुंबईत येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी मुंबई सर्वत्र घेण्यात येत आहे. त्यासाठी मुंबईत जागोजागी रस्त्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे.
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधील ३९ आमदारांनी बंडखोरी केल्याने राज्यात सत्तांतर झाले आहे. तसेच भाजपाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदेंविरोधात अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. काल शिंदेंना शिवसेना नेतेपदावरून काढण्याची घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या कारवाईनंतर शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही कायदेशीर कारवाई करणार असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं. शिवसेनेनं अशी कृती करायला नको होती. शिवसेनेची ही कृती लोकशाहीला शोभणारी नाही. आजही आमच्या हातात शिवबंधन आहे, असं म्हणत दीपक केसरकर यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे.
एकनाथ शिंदे यांच्याशी मध्यस्थी करा-
एकनाथ शिंदे गटानं बंडखोरी करत भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केलं. शिंदे गटात शिवसेनेचे तब्बल ३७ आमदार सामील झाले. शिवसेनेच्या इतिहासातील आजवरचं हे सर्वात मोठं बंड मानलं जात आहे. यातच आता शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी १२ खासदार देखील वेगळा विचार करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवसेना खासदारांच्या एका गटानं शुक्रवारी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आणि एकनाथ शिंदे यांच्याशी मध्यस्थी करण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे.