मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे पक्षाला मोठे भगदाड पडलेले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) डॅमेज कंट्रोसाठी झटताना दिसत आहेत. राज्यातील सत्तासंघर्ष पराकोटीला जात महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. यानंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना पाहायला मिळत आहेत. बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे.
संजय राऊतांविरोधात बंडखोर आमदारांमध्ये एवढा रोष का आहे, असा प्रश्न शहाजीबापू पाटील यांना विचारण्यात आला होता. त्यावर, शहाजीबापू यांनी प्रांजळपणे आपण राऊत यांच्या लिखाणाचे चाहते होतो आणि ‘रोखठोक’ हे सदर आवर्जून वाचायचो असे सांगितलं. मला त्यांचे सदर आवडायचे. मात्र अलीकडे त्यांच्या वागण्यात अहंकाराचा दर्प येऊ लागला असल्याचे ते म्हणाले. तसेच हा माणूस सकाळी १० वाजता बोलायला लागतो. सगळे वातावरण त्यांनी भडक केले आहे, अशी टीका पाटील यांनी केली आहे.
राऊत यांच्याकडून होणाऱ्या टीकेचा त्रास
या अशा वातावरणामध्ये काम होत नाही. बंडखोर आमदारांना राऊत यांच्याकडून होणाऱ्या टीकेचा त्रास होत असल्याचे पाटील यांनी सूचित केले. याशिवाय, आमच्या गटाकडे बहुमत आहे. शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी सर्वाधिक आमदार आमच्या गटात आहेत. निर्णय घेताना याचा विचार विधानसभेचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालय नक्की करेल, असे पाटील यांनी म्हटले आहे. ते बीबीसी मराठीने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.
दरम्यान, आम्ही कालही शिवसेनेत होतो, आजही आहोत आणि उद्याही राहणार, असा पुनरुच्चार करत, आमचीच शिवसेना खरी असल्याचं आम्ही मानतो, असं सांगतानाच पुढील काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील जनता शिंदेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करेल, असा विश्वास पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.