Vidhan Sabha 2019 : भाजपचा १२० जागांचा प्रस्ताव शिवसेनेने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 04:48 AM2019-09-21T04:48:48+5:302019-09-21T04:52:57+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - भाजपने घेतलेली भूमिका आणि शिवसेनेने त्यास स्पष्टपणे दिलेला नकार या खेचाखेचीत राज्यातील सत्तारुढ भाजप-शिवसेना युतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अडला आहे.
मुंबई : शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत १२० पेक्षा अधिक जागा सोडणार नाही अशी भाजपने घेतलेली भूमिका आणि शिवसेनेने त्यास स्पष्टपणे दिलेला नकार या खेचाखेचीत राज्यातील सत्तारुढ भाजप-शिवसेना युतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अडला आहे. शिवसेनेला १२ जागांवर राजी करण्याची खटपट भाजपकडून केली जात आहे.
युतीच्या फॉर्म्युल्याबाबत अफवांचे पीक मात्र जोरात आहे. भाजप व लहान मित्रपक्षांना १६२ जागा आणि शिवसेनेला १२६ जागा असा निर्णय दोन्ही पक्षांमध्ये झाला असल्याची एक अफवा असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसे काही ठरले असल्याचा साफ इन्कार केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १६२-१२६ चा फॉर्म्युला हा शिवसेनेकडून देण्यात आला असून त्यास भाजप राजी नाही. १२० पेक्षा अधिक जागा सोडण्यास भाजप तयार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नाशिकच्या सभेत शिवसेना वा उद्धव ठाकरेंंचा उल्लेखदेखील केला नव्हता. तसेच काही वाचाळ लोक राममंदिराबाबत नको नको ते बोलत आहेत, असा चिमटा मोदी यांनी नाव न घेता काढला होता. तसेच बहुमत नसतानाही फडणवीस यांनी राज्यात चांगले सरकार चालविले, अशी शाबासकीदेखील दिली होती. यावर, ठाकरे आज संतप्त प्रतिक्रिया देतील, असे वाटत असताना त्यांनी मवाळ भूमिका घेतली. ‘राज्यात बहुमताचे सरकार नव्हते पण आम्ही सरकारला कधीही दगा दिला नाही’, असे उद्धव म्हणाले. राममंदिराबाबत ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आपल्याला पूर्ण विश्वास आहे. अयोध्येत राममंदिर लवकर व्हावे ही इच्छा आहे. त्यामुळे या संदर्भातील वक्तव्य आपण केले, असा खुलासा उद्धव यांनी केला.
उद्धव यांनी शिवसेनेचे नेते आणि मंत्र्यांची बैठक शिवसेना भवनात घेतली. युतीबाबतच्या सद्यस्थितीची माहिती त्यांनी बैठकीत दिली. सन्मानजनक युती झाली तरच करू, असे त्यांनी सांगितले पण सन्मानजनक म्हणजे कोणता आकडा शिवसेनेला हवा आहे हे त्यांनी सांगितले नाही.
किशोर तिवारी शिवसेनेत
विदर्भातील शेतकरी नेते आणि राज्य शासनाच्या शेतकरी मिशनचे प्रमुख किशोर तिवारी यांनी उद्धव ठाकरेंच्या हातून शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. पूर्वी ते भाजपमध्ये होते. नंतर त्यांनी विदर्भ जनआंदोलन समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काम सुरू केले होते.
>फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्याची उद्धव यांनी दिली आठवण
युतीचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीच्या वेळीच ठरलेला होता, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला ‘फिप्टी-फिप्टींच्या फॉर्म्युल्याची आठवण करून दिली.‘ लहान मित्रपक्षांना जागा सोडून उर्वरित जागांपैकी निम्मे-निम्मे जागा भाजप-शिवसेना लढेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी म्हटले होते. उद्धव यांनी पत्रकारांना सांगितले की युतीचा फॉर्म्युला येत्या दोन दिवसात जाहीर केला जाईल. १३५-१३५ हा फॉर्म्युला शिवसेनेने दिलेला नाही तर तो मीडियाने काढलेला आहे.