मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक वेगवेगळी लढवून शिवसेनेविरोधात पहारेकऱ्याच्या भुमिकेत बसलेल्या भाजपाने आज विरोधी पक्ष नेते पदाचा दावा केला होता. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता समीकरणे बदलल्याने भाजपाने पालिकेतील भूमिकाही बदलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शिवसेनेने भाजपाची मोठी कोंडी केली आहे.
निवडणुकीनंतर भाजपा महापालिकेत दुसरा मोठा पक्ष ठरला होता. असे असतानाही गेली अडीच वर्षे पहारेकऱ्यांच्या भूमिकेत होता. मात्र, पुढील निवडणूक आणि राजकीय स्थिती बदलल्याने भाजपाने विरोधी पक्ष नेते पदावर दावा केला होता. यामुळे भाजपने विरोधी पक्षनेते पदावर दावा करत प्रभाकर शिंदे यांना भाजपचे नवीन गटनेते व विरोधी पक्षनेते नियुक्त करण्याचे पत्र महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे दिले होते.
यावर शिवसेनेने भाजपाची कोंडी केली आहे. पालिका महासभेत गुरुवारी भाजपचा विरोधी पक्ष नेतेपदावरील दावा सत्ताधारी शिवसेनेने फेटाळला आहे. प्रभाकर शिंदे हे भाजपचे नवीन गटनेते असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे रवि राजा यांची यापूर्वीच नियुक्ती झालेली आहे, असे कारण देत शिवसेनेने भाजपावर कडी केली आहे. विरोधी पक्षनेते असताना नवीन नेता निवडण्याची आवश्यकता नाही, असे मत महापौरांनी मांडले.
नगरसेवकांचा ठिय्याविरोधी पक्षनेतेपदावरील दावा फेटाळल्याने भाजपाच्या ८३ नगरसेवकांनी पालिका मुख्यालयाच्या सभागृहाबाहेर घोषणाबाजी कर ठिय्या आंदोलन केले आहे. दुसरा मोठा पक्ष असल्याने विरोधी पक्षनेते पदावर भाजपचा अधिकार आहे. यासाठी वेळ पडल्यास कोर्टात जाणार असा इशारा, भाजपचे नवीन गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिला.