अल्पेश करकरे
मुंबई : मुंबई पालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प येत्या गुरुवारी, ३ फेब्रुवारी रोजी म्हणजेच उद्या सादर होणार आहे. मुंबई महापालिकेत गेल्या 25 वर्ष अधिक काळापासून शिवसेनेची सत्ता आहे. मुंबई महापालिका 2017 निवडणुकीतही शिवसेनेने सत्ता मिळवली, याचा कार्यकाळ आता 2022 मार्च रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे हे शिवसेनेच या कार्यकाळातील शेवटचं बजेट असणार आहे. मागील वर्षी ३९ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. सन २०२२-२३ चा अर्थसंकल्प ही त्याहून अधिक कोटींचा असेल.
पालिकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा बजेट मुंबईत गेल्या दोन वर्षांपासून करोनाचा मुकाबला करताना मुंबई महापालिकेला हजारो कोटींचा आर्थिक फटका बसला आहे. मात्र त्यानंतरही विकासकामांचे चाक रुतलेले नाही. सन २०२२-२३च्या अर्थसंकल्पात विकासकामांचा हा गाडा गतिमान ठेवण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. यंदाचा महापालिका अर्थसंकल्प सुमारे ४१ हजार कोटींच्या दरम्यान असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्याचा अर्थसंकल्प ऑनलाइन पद्धतीने सादर केला जाणार आहे. पालिकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा व ऑनलाइनपद्धतीने सादर होणारा अर्थसंकल्प असणार आहे.
अनेक अडचणी तरीही विविध सुविधांवर भर द्यावा लागणारमुंबईत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देऊन प्रशासनाला कोट्यवधीच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. दोन वर्षांपासून करोनाच्या संकटात अडीच हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे. करोना आणखी किती काळ राहील याची कोणतीही शाश्वती नसल्याने उत्पन्नवाढीचे अनेक पर्याय शोधत वाटचाल करणाऱ्या पालिकेला येत्या या काळात आरोग्य सुविधांचे अद्ययावतीकरण, विस्तारासह वैद्यकीय सुविधांवरही भर द्यावा लागणार आहे.
आगामी निवडणुकीच्या दृष्टीने नव्या घोषणा ?गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाची महासाथ आहे. या दरम्यान कोरोनाच्या तीन लाटा आल्या आहेत. कोरोनाच्या दोन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. तर तिसरी लाट आटोक्यात आली आहे. कोरोनाचा सामना करताना सर्वात श्रीमंत अशी महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेने २०२१-२२ चा ३९ हजार ०३८ कोटींचा मेगा बजेट सादर केला होता. यामधील डिसेंबर २०२१ पर्यंत ४६ टक्के रक्कम खर्च करण्यात महापालिकेला यश आले आहे. मागील अर्थसंकल्पातील निधी खर्च झाला नसला तरी, महापालिकेची निवडणूक असल्याने मुंबईकरांसाठी नव्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता असल्याने अर्थसंकल्पात वाढ होऊन तो सुमारे ४१ हजार कोटींच्या दरम्यान असेल अशी माहिती मिळत आहे.
या सोयी-सुविधा व तरतुदींची शक्यतामुंबईमधील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सन २०२२ - २३ चा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. यात आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि कोस्टल रोड म्हणजेच किनारपट्टीच्या रस्त्यांसारख्या पायाभूत सुविधांशी संबंधित महत्त्वाच्या विभागांवरील खर्चाला प्राधान्य देण्यात येईल. तसेच, भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता समुद्राचे पाणी गोडे करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून, यासाठी मोठी तरतूद करण्यात येणार आहे. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे समोर आले. त्यामुळे, दवाखान्यांच्या संख्येत वाढ, मोठ्या रुग्णालयांचा विस्तार यांसह येणाऱ्या रुग्णांसाठी योग्य व उत्तम आरोग्य व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार आहे.
शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क असून सन २०२१ - २२ या वर्षांसाठी २,९४५.७८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तर, यंदा सन २०२२ - २३ या वर्षांसाठी भरीव तरतूद करण्यात येणार आहे. विविध विषाणूंचा अभ्यास करण्यासाठी विशेष रुग्णालये, सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या नव्या शाळा, कचऱ्याची विल्हेवाट प्रकल्प, कचर्यापासून वीज प्रकल्प, पर्यटनाला चालना देण्यासाठी योजना, पर्यावण संवर्धन उपक्रम, उत्पन्न वाढीसाठी नवीन स्तोत्र निर्माण करणे, पुलांच्या मजबुतीसाठी, नवीन पुलांसाठी विशेष निधी तसेच मुंबईत सुरक्षेसाठी अधिक प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी निधी तरतूद यात असेल.