‘नोटा’ला झालेले मतदान ही भाजप व मिंधे गटाची मळमळ, निकालानंतर शिवसेनेचा टीकेचा बाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 08:15 AM2022-11-07T08:15:16+5:302022-11-07T08:16:59+5:30

मिंधे गटाचा पाळणा कितीही हलवला तरी तो रिकामाच राहील, शिवसेनेचे जोरदार निशाणा.

shiv sena samaana editorial targets eknath shinde group bjp over voting nota andheri by polls election result rutuja latke wins | ‘नोटा’ला झालेले मतदान ही भाजप व मिंधे गटाची मळमळ, निकालानंतर शिवसेनेचा टीकेचा बाण

‘नोटा’ला झालेले मतदान ही भाजप व मिंधे गटाची मळमळ, निकालानंतर शिवसेनेचा टीकेचा बाण

googlenewsNext

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) या विजयी झाल्या आहेत. ऋतुजा यांनी केवळ बहुमतच मिळाले नसून दिवंगत पती रमेश लटके यांचा विक्रमही त्यांनी मोडला आहे. या निवडणुकीत नोटालाही जास्त मिळाली. नोटाला १२ हजारांपेक्षा अधिक मत मिळाली आहेत, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून आता यावर टीकेचा बाण सोडला आहे.

भाजप आणि मिंधे गटाने माघारीचे नाटक केले, पण प्रत्यक्षात ‘नोटा’च्या बुरख्याआड रडीचा डाव खेळले. माघारीनंतरही त्यांच्या अंगातले किडे वळवळतच होते. त्यातूनच लोकांनी मतदान केंद्रावर जाऊन ‘नोटा’चे बटण दाबावे, असे प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक केले. वास्तविक, कायद्यानुसार ‘नोटा’चा प्रचार करता येत नाही. ‘नोटा’ हा पूर्णपणे ऐच्छिक विषय आहे. तरीही ‘नोटा’चा प्रचार केला गेल्याचे शिवसेनेने म्हटलेय.

'खोके खर्चले'
लोकांनी मतदान केंद्रांवर जाऊन ‘नोटा’चे बटण दाबावे यासाठी काही ‘खोकी’ खर्चण्यात आली. त्यामुळे खोके सरकार आपल्या नामकरणास पुरेपूर जागले. निवडणूक ग्रामपंचायतीची असो नाही तर विधानसभेची, खोक्यांशी नाते कायम ठेवायचे असे या मंडळींनी ठरवले आहे. अंधेरीच्या पोटनिवडणुकीतही तेच झाले. येथे ‘नोटा’साठी नोटा वापरल्या गेल्या. एकूण मतदानापैकी 12 हजार 806 मते ‘नोटा’ या पर्यायाला मिळाली. अर्थात, एवढे सगळे उपद्व्याप करूनही जनता ना ‘नोटां’ना भुलली ना ‘नोटा’च्या भुलभुलैयाला! असे संपादकीयमध्ये नमूद करण्यात आलेय.

'… त्याची ही नांदी'
‘नोटा’ला झालेले मतदान ही भाजप व मिंधे गटाची मळमळ होती. मतदारांनी मात्र ऋतुजा लटके यांच्या पारडय़ात भरभरून मतदान केले आणि भाजप-मिंध्यांचे कारस्थान उधळून लावले. या पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का कमी होता. पण भाजप किंवा लाचार मिंधे गटाचा उमेदवार असता तर जनता अधिक जोमाने व त्वेषाने मतदान केंद्रावर पोहोचली असती. मतदानाचा आकडा 60 टक्क्यांवर गेला असता व मिंध्यांच्या बुडास मशालीचे चटके बसले असते. अर्थात उद्याच्या मुंबई, ठाणे, महानगरपालिकेत जनतेचा कौल कोठे आहे त्याची ही नांदी असल्याचेही शिवसेनेने म्हटलेय.

'… तरी पाळणा रिकामाच राहणार'

ईश्वराचे नाव घ्या नाही तर आणखी कोणाचे, मुंबई महानगरपालिकेवरचा शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भगवा उतरविणे कोणाच्या बापास जमणार नाही. शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवून घेण्याचे पाप सध्याच्या कंस मामांनी केले. ईश्वराने नव्हे! ईश्वराचे वरदान शिवसेनेस (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लाभले आहे. त्यामुळे हाती मशाल घेऊन शिवसेना तुमच्या छाताडावर पाय देऊन उभीच राहील. मिंधे गटाचा पाळणा कितीही हलवला तरी तो रिकामाच राहील व कोणत्याही वेळी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची घोषणा होईल, अशा हालचाली राजकीय भूगर्भात सुरू आहेत याची मिंधे गटास कल्पना नाही. आम्ही मात्र कोणत्याही मैदानात उतरून आव्हानांचे घाव परतवून लावण्यास तयार आहोत, असा इशाराही यातून देण्यात आलाय.

Web Title: shiv sena samaana editorial targets eknath shinde group bjp over voting nota andheri by polls election result rutuja latke wins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.