मुंबई: महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Election 2022) प्रक्रिया सुरू आहे. सर्वच्या सर्व आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सायंकाळी ५ वाजता मतमोजणी सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, काँग्रसने भाजपच्या दोन उमेदवारांच्या मतदानावर आक्षेप घेतल्यामुळे अद्यापही मतमोजणीला सुरुवात झालेली नाही. महाविकास आघाडी आणि भाजपसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झालेली आहे. कारण दोन्ही बाजूंनी आपापले उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा केला आहे. यातच आता आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. यातच आता राज्यसभा निवडणुकीच्या अटी-तटीच्या आणि अत्यंत चुरशीच्या लढतीत शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाले. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते विधिमंडळात आले होते. यावेळी त्यांनी आपले मनोगत सविस्तरपणे व्यक्त केले.
विधान परिषदेची निवडणूक अजिबात चुरशीची नाही. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी निश्चितच निवडून येतील. मी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आलेलो आहे. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार नक्कीच विजयी होतील, याची मला खात्री आहे, असे संजय पवार म्हणाले.
भाजपचा तो डाव यशस्वी होणार नाही
काँग्रेसचे भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर आक्षेप घेतला होता. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने तो फेटाळला. यासंदर्भात बोलताना, महाराष्ट्रातील आतापर्यंत सर्व काही पाहिले आहे. भाजपवाले सर्व यंत्रणांचा वापर करून घेतात. लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न वारंवार होताना दिसत आहे. यावेळी भाजपचा तो डाव यशस्वी होणार नाही, असे संजय पवार म्हणाले.
मी विजयी झालो, मी खासदार आहे, असेच मला वाटत आहे
राज्यसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाविषयी बोलताना, निवडणुकीत जय-पराजय होत असतात. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझा योग्य सन्मान केला. मला मान दिला. तो माझ्यासाठी फार मोठा आहे. त्यातच मी विजयी झालो, मी खासदार आहे, असेच मला वाटत आहे. आमश्या पाडवी आणि सचिन अहिर निवडून आले, तर मीच निवडून आलो, असे मला वाटेल, असे संजय पवार म्हणाले.
पुढील २५ वर्ष महाविकास आघाडी भक्कम राहील
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फुटली. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर बोलताना, महाविकास आघाडी भक्कम आहे. पुढील २५ वर्ष ती भक्कम राहील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोण गद्दार आहेत, हे शोधायला सुरुवात केली आहे. यासह तीनही पक्षांचे नेते मिळून याचा शोध घेतील. मी आनंदी आहे. मला कोणताही खेद नाही. बॉस इज ऑलवेज राइट, ते काय ते आता बघून घेतील, असे संजय पवार म्हणाले.