मुंबई: शिवसेना आणि भाजपमधील वाद दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडेच एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला दिलेल्या युतीच्या प्रस्तावानंतर आरोप-प्रत्यारोपांची धार अधिकच वाढत चाललेली दिसत आहे. यातच द काश्मीर फाइल्स या चित्रपटावरूनही केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला जात आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) वर टीका केली आहे. मोदीजी, पाकव्याप्त काश्मीर पुन्हा हिंदुस्तानाला कधी जोडत आहात, असा रोखठोक सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. काश्मीर हा देशासाठी आणि देशातील जनतेसाठी अत्यंत संवेदनशील विषय आहे. अनेक वर्षांपासून काश्मिरवरून राजकारण सुरू आहे. आम्हाला वाटले होते मोदी सरकार आल्यावर राजकारण थांबेल. पण ते वाढतच चालले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणण्याची घोषणा केली होती. तेव्हा आता मोदीजी तुम्ही पाकव्याप्त काश्मीर पुन्हा हिंदुस्तानाला कधी जोडत आहात? जे वीर सावरकर यांचे स्वप्न होते ते पूर्ण झाल्याचे आम्हाला या जन्मात पाहता येईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते मीडियाशी बोलत होते.
‘द काश्मीर फाइल्स’च्या निर्मात्यांना आता पद्म पुरस्कार
‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटात अनेक गोष्टी अशा आहेत, ज्या असत्य आहेत, ज्या घडलेल्या नाहीत. पण तो चित्रपट आहे, ज्यांना पाहायचा आहे ते पाहतील आणि ज्यांना खटकले असेल ते बोलतील, तेवढे स्वातंत्र्य आपल्या देशात आहे. काश्मीरवर चित्रपट तयार केला असेल तर त्यामध्ये काहीही अयोग्य नाही. याचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न केला जाईल. पण त्यांना यश येणार नाही. ‘द काश्मीर फाइल्स’मध्ये अनेक सत्य गोष्टी दडपण्यात आल्याचा आरोप आहे. भाजप आणि पंतप्रधान मोदी या चित्रपटाचा प्रचार करत आहेत. हा चित्रपट तयार करणाऱ्यांना केंद्राने वाय दर्जाची सुरक्षाव्यवस्था दिली. आता त्यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्म पुरस्कार दिला जाईल, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.
दरम्यान, काश्मिरी पंडितांसोबत शिखांनीही बलिदान केले आहे. सुरक्षा दलातील मुस्लीम पोलिसांना अतिरेक्यांनी मारले आहे. काश्मिरी पंडित सांगतात की त्यांचे प्राण वाचवायला अनेकवेळा मुस्लिम अधिकारी आले होते. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे कश्मिरी पंडितांची घरवापसी कधी होणार? काश्मिरमधील युवकांची बेरोजगारी कधी संपवणार आहात? काश्मीरमध्ये सर्वात मोठी गुंतवणूक कधी करणार आहात, असे अनेक सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केले.