“...तेव्हा निवडणूक लढवली असती, तर पंतप्रधान शिवसेनेचा असता!”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 12:30 PM2022-01-24T12:30:27+5:302022-01-24T12:30:41+5:30
बाबरीनंतर शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंची उत्तर भारतामध्ये एक लाट होती. ते खरे हिंदूहृदयसम्राट होते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मुंबई: गोवा, उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना सातत्याने भाजपवर टीका करताना पाहायला मिळत आहे. तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकांवरूनही शिवसेना-भाजप आमनेसामने आल्याचे दिसत आहे. अशातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ठरवले असते तर देशात शिवसेनेचा पंतप्रधान झाला असता, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यांचे संजय राऊत यांनी समर्थन केले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपाला शिवसेनेनं महाराष्ट्रामध्ये जमीनीपासून आकाशापर्यंत नेले. ठरवले असते, तर देशात शिवसेनेचा पंतप्रधान असता, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
आम्ही युतीचा धर्म कायम पाळला, इतिहास साक्ष आहे
आम्ही युतीचा धर्म कायम पाळला. इतिहास याला साक्ष आहे. उद्धव ठाकरेंनी आपली खंत व्यक्ती केली ती योग्य आहे. ही एकट्या शिवसेनेची गोष्ट नाही. तर जे चांगल्या हेतूने भाजपासोबत गेलेत त्या सर्व पक्षांचे हेच हाल झाले आहेत. अकाली दल असो, गोव्यात एमजीपी असो किंवा हरियाणा असो, चंद्रबाबू नायडू असो, जयललिता असो सर्वांना त्याची किंमत चुकवावी लागली. मात्र शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे ज्याने त्यांना किंमत चुकवावी लागेल असे काम केले आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
ते खरे हिंदूहृदयसम्राट होते
बाबरीनंतर शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंची उत्तर भारतामध्ये एक लाट होती. आम्ही सारे भाजपसाठी सोडले. तुम्ही देशात पुढे व्हा आम्ही महाराष्ट्रात काम करु, असे बाळासाहेबांचे भाजपप्रती धोरण होते. हा बाळासाहेबांचा मोठेपणा होता. ते खरे हिंदूहृदयसम्राट होते, असे नमूद करत एक हिंदू पार्टी देशात वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्यात अडचण ठरणार नाही अशी बाळासाहेबांची भूमिका होती, असेही राऊत म्हणाले.