Join us

Sanjay Raut on Kirit Somaiya: “देशमुख, मलिकांच्या शेजारची कोठडी, बाप-बेटे तुरुंगात जाणार”; राऊतांचा सोमय्यांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 9:07 PM

Sanjay Raut on Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर लगेचच संजय राऊत यांनी ट्विट केले.

मुंबई: राज्यात अनेकविध घटनांमुळे राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे आयएनएस विक्रांतच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. यामुळे किरीट सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार असल्याचे म्हटले जात आहे. यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमय्या पिता-पुत्रांवर निशाणा साधला आहे. 

संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत निधी प्रकरणी किरीट सोमय्या यांच्यावर आर्थिक अपहार केल्याचा आरोप केला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर किरीट सोमय्या यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला. यानंतर किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी सेशन कोर्टात अर्ज केला होता. मात्र, किरीट सोमय्या यांचा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला. 

बाप बेटे तुरुंगात जाणार

संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये बाप-बेटे तुरुंगात जाणार, अनिल देशमुख आणि नवाब मलिकांच्या शेजारच्या कोठडीत राहणार, असे ट्विट केले आहे. तसेच आग लगाने वालों का कहाँ खबर रुख हवाओं ने बदला तो खाक वो भी होंगे, असेही ट्विटमध्ये म्हटले आहे. आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात सोमय्या यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून किरीट सोमय्या नॉट रिचेबल आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून ते माध्यमांसमोर आलेले नाहीत. 

दरम्यान, विक्रांत निधी संकलन प्रकरण २०१३ मधील आहे. त्या प्रकरणी आता एफआयआर दाखल झाला आहे. यासाठी दबाव आणण्यात आला होता, असा युक्तिवाद किरीट सोमय्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. शिवसेना आणि अन्य पक्षांनी विक्रांतसाठी निधी गोळा केला होता. सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी जमा केलेला निधी आपल्या पक्षाकडे सुपूर्द केला, असेही किरीट सोमय्यांचे वकील पुढे म्हणाले. 

टॅग्स :राजकारणसंजय राऊतकिरीट सोमय्या