Padma Awards 2022: “मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याची प्रथा थांबायला हवी”; संजय राऊतांची मोदी सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 03:45 PM2022-01-26T15:45:30+5:302022-01-26T15:46:31+5:30
Padma Awards 2022: व्यक्ती हयात असताना त्यांना पुरस्कार का देण्यात आले नाहीत, असे सांगत संजय राऊतांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.
मुंबई: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची (Padma Awards 2022) घोषणा केली. यामध्ये विविध क्षेत्रातील दिग्गजांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. व्यक्ती हयात असताना त्यांना पुरस्कार का देण्यात आले नाहीत. पण मरणोत्तर पुरस्कार देण्याची पायंडे, प्रथा थांबायला हवी, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
यंदाच्या पद्म पुरस्कारांमध्ये देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत, बालाजी तांबे, कल्याण सिंह यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त गांधी कुटंबियांनी ट्विट केले नाही, याचे फडणवीसांना फार वाईट वाटले आहे. मग तुमच्या केंद्रातील सरकारला त्यांना एखादा पद्म पुरस्कार द्यावासा का वाटला नाही, याचा त्यांनी खुलासा केला तर आम्हाला प्रतिक्रिया देणे सोप जाईल, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले.
मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याची प्रथा थांबवायला हवी
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्यासह राज्यातील तीन लोकांना पद्म पुरस्कार मिळाला आहे. या तिघांनीही पद्म पुरस्कार नाकारला आहे. पुरस्कार देताना त्यांना विचारणा झाली नसेल. हल्ली उठसूट कोणालाही पद्म पुरस्कार दिले जातात. त्यामुळे पुरस्कार नाकारले जातात, हे चित्र बरोबर नाही. अनेकांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले आहेत. जिवंतपणी तुम्ही त्यांची किंमत करत नाही. बालाजी तांबे यांना गेल्या सात वर्षांमध्ये पुरस्कार का देण्यात आला नाही? या व्यक्ती हयात असताना त्यांना पुरस्कार का देण्यात आले नाहीत. पण मरणोत्तर पुरस्कार देण्याची प्रथा थांबायला हवी, या शब्दांत संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाच्या काळात त्यांच्यावर टीका करणारा राज्यातील विरोधी पक्ष हा नामर्द आहे. मात्र, राज्यातील जनतेने त्यांना प्रत्युत्तर दिले. आता तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण केले. त्यानंतर मुख्यमंत्री शिवतीर्थावरील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमालाही उपस्थित होते. त्यामुळे राज्यातील जनता उत्साहात आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.