Sanjay Raut On The Kashmir Files: “कलम ३७० हटवल्यानंतरही काश्मिरी पंडितांची घरवापसी नाही, हे अपयश कुणाचे?”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 10:23 AM2022-03-20T10:23:49+5:302022-03-20T10:26:05+5:30

Sanjay Raut On The Kashmir Files: ‘द कश्मीर फाइल्स’सारखे चित्रपट निर्माण व्हायला हवेत, पण...; संजय राऊतांची मोदी सरकारवर टीका

shiv sena sanjay raut criticised modi govt and bjp over the kashmir files movie and asked many questions | Sanjay Raut On The Kashmir Files: “कलम ३७० हटवल्यानंतरही काश्मिरी पंडितांची घरवापसी नाही, हे अपयश कुणाचे?”: संजय राऊत

Sanjay Raut On The Kashmir Files: “कलम ३७० हटवल्यानंतरही काश्मिरी पंडितांची घरवापसी नाही, हे अपयश कुणाचे?”: संजय राऊत

Next

मुंबई: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट (The Kashmir Files) चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहात हजेरी लावत आहेत. अनेक बड्या चित्रपटांना टक्कर देत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवत १०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. यातच विरोधकांकडून मात्र यावरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

संजय राऊत यांनी दैनिक सामनामधील आपल्या रोखठोक सदरातून काश्मिरी पंडितांची घरवापसी, द काश्मीर फाइल्स चित्रपट आणि कलम ३७० यांसंदर्भात अनेकविध प्रश्न उपस्थित करत मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अनुच्छेद कलम ३७० हटवल्यानंतरही काश्मिरी पंडितांची घरवापसी नाही, हे अपयश कुणाचे, अशी विचारणाही त्यांनी केली आहे. 

काश्मिरी पंडितांची घरवापसी होऊ शकली नाही

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिमतीने काश्मिरातील अनुच्छेद ३७० रद्द केले. काश्मिरातून लेह-लडाख वेगळे केले व काश्मीरला सरळ केंद्रशासित राज्य बनवले. काश्मिरातील विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेचे काम संपले आहे. या पद्धतीने जम्मू प्रांतातील विधानसभेच्या जागा वाढतील व त्या प्रांताचा मुख्यमंत्रीसुद्धा एखादा हिंदू होईल. हे चित्र चांगले आहे, पण नव्वदच्या दशकात परागंदा झालेल्या काश्मिरी पंडितांची ‘घरवापसी’ हा मोदी सरकारचा मोठा कार्यक्रम होता. अनुच्छेद ३७० काढल्यावरही पंडितांची घरवापसी होऊ शकली नाही. हे कोणाचे अपयश आहे?, असा सवाल करत संजय राऊत यांनी केला आहे. 

‘द कश्मीर फाईल्स’सारखे चित्रपट निर्माण व्हायला हवेत

‘द कश्मीर फाइल्स’सारखे चित्रपट निर्माण व्हायला हवेत, पण अशा चित्रपटांचा अजेंडा हा राजकीय विरोधकांबाबत द्वेष आणि भ्रम फैलावणे असाच झाला आहे. याच चित्रपटाच्या निर्मात्याने ‘द ताश्कंद फाइल्स’ हा चित्रपट बनवला होता. तोही एका विशिष्ट गटाचाच अजेंडा ठरला. लाल बहाद्दूर शास्त्रींच्या मृत्यूला फक्त गांधी परिवार जबाबदार असल्याचा ‘प्रपोगंडा’ या चित्रपटातून करण्यात आला. चित्रपट निर्मितीमागचा जणू तोच एकमेव हेतू होता. देशाचा इतिहास फक्त पुस्तकांतूनच बदलला जात नाही, तर आता चित्रपटांसारख्या माध्यमांतूनही तो बदलण्याचा प्रयत्न होतोय, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. 

काश्मिरी पंडित त्यात सगळ्यात जास्त भरडून निघाले

काश्मीरचा माहोल ३२ वर्षांपूर्वी फक्त काश्मिरी पंडितांसाठीच खराब नव्हता, तर सगळ्यांसाठीच खराब होता आणि काश्मिरी पंडित त्यात सगळ्यात जास्त भरडून निघाले. त्या वातावरणात पंडितांबरोबरच काश्मिरी शीख, मुसलमानांच्याही हत्या झाल्या. काश्मिरात पहिली राजकीय हत्या नॅशनल कॉन्फरन्सचा नेता मोहम्मद युसूफ हलवाईची यांची ऑगस्ट १९८९ मध्ये झाली. त्या आधी प्रशासकीय अधिकाऱ्यावर जो पहिला हल्ला झाला होता तो पोलीस महानिरीक्षक जी. एम. बटालीवर. त्यात बटालीचा अंगरक्षक ठार झाला. त्यानंतर थोड्याच दिवसांत बटालीचे लहान भाऊ गुलशन बटालींची हत्या करण्यात आली. अशा अनेक गोष्टींचे सत्य ‘द कश्मीर फाइल्स’मधून लपविले गेले आहे. सन १९४७ नंतर ४३ वर्षे कश्मिरी पंडितांवर पळून जाण्याची नौबत कधीच आली नव्हती. सन १९९० साली ४ लाख हिंदू-शिखांना काश्मीर सोडण्यास भाग पाडले. तेव्हा केंद्रात भाजपच्या पाठिंब्यावर व्ही. पी. सिंगांचे सरकार होते. भाजपचे नेते जगमोहन हे कश्मीरचे राज्यपाल होते. खोऱ्यांत हिंदू मरत होते, पळत होते तेव्हा ‘काश्मीर फाईल’ थंड बासनात पडून होती, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. 
 

Web Title: shiv sena sanjay raut criticised modi govt and bjp over the kashmir files movie and asked many questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.