मुंबई: संक्तवसुली संचालनालयाने कारवाई करत अलिबाग येथील प्लॉट आणि दादर येथील एक फ्लॅट जप्त केल्यानंतर आता संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. राज्यसभेत किरीट सोमय्या यांनी केलेल्या आयएनएस विक्रांत घोटाळ्यावर आवाज उठवल्यानंतर संजय राऊत यांचे मुंबईत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी संजय राऊतांनी भाजपला आव्हान देत सडकून टीका केली. राजकीय विरोधाचा विचाराने सामना करायचा प्रकार असतो. पण तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून सगळ्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हीही उद्ध्वस्त झाल्यासिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
मुंबई विमानतळावर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांसह भाजपवर निशाणा साधला. आयएनएस विक्रांतचा घोटाळा भाजप नेत्यांकडून झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्रात गावपातळीवर शिवसैनिकांचे आंदोलन झाले. हा संताप आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हल्ले केले जात आहेत. याविरुद्ध हा उसळलेला आगडोंब आहे. ही सुरुवात आहे. ठिणगी पडली आहे. यापुढे जसजशी त्यांची पावले पडतील, तशी आमची पावले पडतील, या शब्दांत संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
पुढील २५ वर्ष भाजपला महाराष्ट्रात सत्तेत येऊ देणार नाही
तुम्ही आमचे काय करणार? केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजप आमच्यावर हल्ले करत आहे. ते फारतर आम्हाला तुरुंगात पाठवतील. माझी तयारी आहे. आम्हाला ठार मारतील, आमची तयारी आहे. पण यापुढचे २५ वर्ष तुमचे राज्य महाराष्ट्रात येणार नाही याची तजवीज तुम्हीच करून ठेवली आहे. तुम्ही तुमची कबर महाराष्ट्रात खणली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भाजपचे लोक आयएनएस विक्रांत घोटाळा करणाऱ्या किरीट सोमय्यांच्या बाजूने उभे आहेत. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. या आरोपांचे किरीट सोमय्यांकडे उत्तर असू शकत नाही. पुराव्यासह भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. राज्यसभेत त्यांच्याच पक्षाचे खासदार यावर बोलू शकलेले नाहीत. कारण त्यांनाही माहिती आहे की घोटाळा झाला आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.