मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत हे राजकीय पटलावरचं असं नाव आहे ज्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण बदलून टाकलं. संजय राऊत आणि पत्रकार परिषद हे जणू एक समीकरणच बनलेले. राज्यात काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची जी ऐतिहासिक अशी महाविकास आघाडी बनली आहे त्यात संजय राऊत यांचा मोलाचा वाटा आहे हे कोणी नाकारू शकणार नाही. आपल्या धडाडीच्या वक्तव्याने ते नेहमीत माध्यमांच्या फ्रेममधील चर्चेत असणारा चेहरा आहेत. इतकचं नाही संजय राऊत सोशल मीडियातही एक्टिव्ह असतात. ट्विटरच्या माध्यमातून शेरोशायरी करत त्यांनी अनेक विरोधकांना घायाळ केले आहे. संजय राऊत यांना आज लोकमतकडून बेस्ट पॉलिटिकल ओपिनियन मेकर या डिजीटल इन्फ्लूअन्सर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. लोकमत समुहाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या हस्ते संजय राऊतांना पुरस्कार देण्यात आला.
एकेकाळचे क्राईम रिपोर्टर ते आजचे यशस्वी राजकारणी असा संजय राऊत यांचा प्रवास राहिला. शत्रूला थेट अंगावर घेऊन भिडणारे व्यक्तीमत्व अशी संजय राऊतांची ओळख आहे. सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन त्यांनी भाजपाची सळो की पळो अशी अवस्था केली होती. वडाळा येथील आंबेडकर महाविद्यालयातून बी कॉमची पदवी घेतलेल्या राऊतांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात पत्रकारितेपासून केली होती. सुरुवातीला इंडियन एक्सप्रेसच्या पुरवठा विभागात काम करणारे पुढे जाऊन लोकप्रभा साप्ताहिकासाठी क्राईम रिपोर्टर म्हणून काम पाहू लागले.
अनेक खळबळजनक बातम्या देऊन संजय राऊतांनी पत्रकारितेतही नाव कमावलं होतं. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची नजर संजय राऊतांवर पडली. राऊत यांची भूमिका शिवसेनेशी मिळतीजुळती असल्याने बाळासाहेबांनी ‘सामना’ या मुखपत्राची सुरुवात करताना संजय राऊत यांना बोलावून घेतले. १९८९ मध्ये संजय राऊत सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात रुजू झाले. त्यानंतर अवघ्या ५ वर्षात संजय राऊत यांना सामनाच्या कार्यकारी संपादकपदाची जबाबदारी देण्यात आली. संजय राऊत यांनी आजपर्यंत थेट कधीही निवडणूक लढवली नाही. मात्र आजही ठाकरे कुटुंबात विश्वासाचं स्थान आणि शिवसेनेत संघटनात्मक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. बाळासाहेबांपासून अगदी आदित्य ठाकरेंपर्यंत सर्वांशी जुळवून घेत संजय राऊत यांनी वेगळी पकड निर्माण केली आहे.