‘ते’ ५५ लाख परत केले तिथेच संजय राऊतांनी गुन्हा कबूल केला; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 03:04 PM2022-04-05T15:04:14+5:302022-04-05T15:05:12+5:30
ED Action on Sanjay Raut: पोलिसांचा माफियासारखा उपयोग करून ईडी, सीबीआय, तपास यंत्रणांचे तोंड बंद करता येईल असं ठाकरे सरकारला वाटत होते. परंतु कारवाई होणार हे स्पष्ट झाले आहे असं सोमय्यांनी सांगितले.
मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) यांच्या कोट्यवधीच्या मालमत्तेवर ईडीनं कारवाई करत जप्त केली आहे. त्यात दादरमधील फ्लॅट, अलिबागमधील ८ प्लॉट जप्त केले आहे. गोरेगावच्या पत्राचाळ प्रकल्पात संजय राऊतांचे आर्थिक भागीदार प्रविण राऊतांनी १ हजार कोटींचा घोटाळा केला होता. ईडीने संजय राऊत यांना समन्स पाठवलं होते तेव्हा राऊतांनी ५५ लाख मिळाल्याचं कबुल करत ते पुन्हा परत केले होते. ५५ लाख का घेतले होते? ५५ लाख चेकने असतील तर अन्य रोकड किती मिळाली? याचं उत्तर संजय राऊत देत नाहीत असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्यांनी केला.
याबाबत पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्यांनी(BJP Kirit Somaiya) म्हटलं की, आम्ही जे आरोप केले ते पुरावे देऊन केले. ज्यावेळी राऊतांनी ईडी कार्यालयात ५५ लाख परत केले तेव्हाच त्यांनी आपला गुन्हा कबुल केला होता. ईडीने यावरच थांबू नये. संजय राऊत यांच्या पत्नीचे प्रविण राऊतांच्या पत्नीसोबत आर्थिक गैरव्यवहार बाहेर आले आहेत. गेल्या २ महिन्यापासून राऊतांची धडपड, धावपळ, ईडीच्या अधिकाऱ्यांवर आरोप करणं त्यांची मानसिक अवस्था मी समजू शकतो. राऊतांनी १२ पानी पत्र लिहिलं. पोलिसांचा माफियासारखा उपयोग करून ईडी, सीबीआय, तपास यंत्रणांचे तोंड बंद करता येईल असं ठाकरे सरकारला वाटत होते. परंतु कारवाई होणार हे स्पष्ट झाले आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच घोटाळेबाजांवर कारवाई होणार हे आम्ही आधीपासून सांगत होतो. ही फक्त कारवाईची सुरूवात आहे. भ्रष्टाचाराचे ५५ लाख परत करू मग पुढे कारवाई होणार नाही असा संजय राऊतांचा भ्रम आहे. मी केंद्रीय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना भेटलो. या षडयंत्रात संजय राऊतांची भूमिका काय? याचीही चौकशी केली पाहिजे. प्रविण राऊतांना वाचवण्यासाठी राऊतांनी पंतप्रधानांपासून ईडी अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांवर आरोप केले. तपास करणाऱ्या संस्था त्यांची जबाबदारी पार पडत असतात. संजय राऊतांनी ईडी कारवाईची चाहूल लागली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांपासून गृहमंत्र्यांच्या भेटीगाठी सुरू होत्या. पण या भेटीचा आज खुलासा झाला आहे असा आरोप किरीट सोमय्यांनी केला.
दरम्यान, ईडीच्या विरोधात एसआयटी स्थापन करणार असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) स्वत: घोषित करतात. उद्धव ठाकरे महाराष्ट्रात वेगळा कायदा बनवत आहेत का? जर एखाद्या तपास यंत्रणेतील अधिकारी मनमानी किंवा भ्रष्टाचार करत असेल तर तुम्ही संबंधित यंत्रणांकडे लेखी तक्रार केली का? भ्रष्ट लोकांना वाचवण्यासाठी पोलिसांचा माफिया म्हणून वापर करणं योग्य नाही असंही सोमय्यांनी सांगितले.