मुंबई: आताच्या घडीला शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष तीव्र होताना पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांवरून दोन्ही पक्ष एकमेकांवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. अशातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. विकासाची दृष्टी असलेला आणि विकासाआड राजकारण न आणणारा राष्ट्रीय स्तरावर शरद पवार यांच्यानंतर जर कोणी नेता असेल तर तो म्हणजे नितीन गडकरी, असे कौतुकोद्गार शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काढले. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या वाढदिवसानिमित्त संजय राऊतांनी शुभेच्छा दिल्या.
सध्या देशात जो विकास दिसतोय आणि या विकासाची चित्रे दाखवली जात आहेत, त्यातील ९० टक्के काम हे नितीन गडकरी यांचे आहे. रस्ते पूल आणि आपल्या सीमेपर्यंतची दळणवळणाची साधने निर्माण झाली, त्याचे श्रेय गडकरी यांना द्यावे लागेल. नितीन गडकरी हे महाराष्ट्राचे आहेत, म्हणून मला त्यांचा सदैव अभिमान आहे, देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राचे योगदान काय, हे नितीन गडकरी यांनी केलेल्या गेल्या सात वर्षांतील कामांमधून आपल्याला दिसून येईल. नितीन गडकरी हे जरी भारतीय जनता पक्षाचे नेते असले, तरी देशातील प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक नेता हा त्यांचा चाहता आहे, गडकरींच्या टीकाटिपणीमध्ये कधी विखार नसतो, ते स्वभावाने फटकळ आहेत, पण मनाने निर्मळ आहेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
माझ्यावर कोल्हापूरची जबाबदारी पक्षप्रमुखांनी दिलेली आहे
संजय राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. त्याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता, माझ्यावर कोल्हापूरची जबाबदारी पक्षप्रमुखांनी दिलेली आहे. तिथे शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी आम्ही प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच असदुद्दीन ओवेसी खासदार आहेत, संसदेचे सदस्य आहेत, त्यांच्या पक्षाची भूमिका आणि आमची भूमिका यात टोकाचे अंतर आहे. पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर मी बोलणे योग्य नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.