मुंबई: ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण अधिकच तापताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. शिवसेनेसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे. यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गट यांतील संघर्ष आणखी तीव्र होताना दिसत आहे. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे कौतुक केले आहे. शरद पवार राजकारणातील भीष्म पितामह आहेत. त्यांचा सल्ला आम्ही नेहमीच घेत असतो, असे संजय राऊत म्हणाले.
शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर आले होते. याबाबत विचारण्यात आले. यावर त्यांनी अगदी स्पष्टपणे भूमिका मांडली. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या माझा कट्टा या कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते. यावेळी शिवसेनेत झालेली बंडखोरी, महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्याचे संकट, शिवसेनेची सुरू असलेली कारवाईची तयारी यांसह अनेक मुद्द्यांवर अगदी रोखठोक भाष्य केले. शरद पवार राजकारणातील भीष्म पितामह
शरद पवार हे राजकारणातील भीष्म पितामह आहेत. ते एक ज्येष्ठ आणि अतिशय अनुभवी नेते आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीनंतर ते स्वतः मैदानात उतरले होते. त्यांनी प्रत्येक आमदाराला पुन्हा आणले होते. त्यावेळेस आम्हीही अगदी पुढे होऊन त्यांना मदत करत होतो. त्यात एकनाथ शिंदेही होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारबाबत किंवा अन्य मुद्द्यांबाबत आम्ही कायम त्यांचा सल्ला घेत असतो, असे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यामागे त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे आताही राष्ट्रवादीचे नेते आणि खुद्द शरद पवार हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले होते, असे संजय राऊत म्हणाले.
१०० टक्के उद्धव ठाकरेंच्या मनात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे हेच होते
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. हिंदुत्व वगैरे हे संगळे तोंडी आहे. त्यांना मुख्यमंत्री होण्यापासून भाजपने रोखले आहे. जर भाजपने आश्वासन पाळले असते तर तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या मनात मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव होते. भाजपमुळेच ते मुख्यमंत्री होऊ शकले नाही आणि त्यात भाजपसोबत ते जायला निघालेत ही आश्चर्यकारक गोष्ट आहे, असे संजय राऊत म्हणाले.