मुंबई: बेळगाव महानगरपालिकेत झालेल्या पराभवानंतर शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष आणखी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने बेळगाव महानगरपालिकेवर सत्ता स्थापन केली आहे. यानंतर आता कर्नाटक सरकारने केलेल्या भाषिक जनगणनेत मराठी भाषिकांची संख्या कमी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बेळगावात फक्त १५ टक्के मराठी भाषिक असल्याचा अजब निष्कर्ष कर्नाटक सरकारने काढला आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. या प्रकरणी ठाकरे सरकार गप्प का बसले आहे. भूमिका घ्यायला हवी, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. (shiv sena sanjay raut react over bjp karnataka govt belgaum marathi speakers counting)
सीमाभागातील मराठी भाषिकांचा लढा कमकुवत करण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केला आहे. तसेच याविरोधात आपल्याला कोर्टात जावे लागेल, असेही सतेज पाटील यांनी म्हटले आहे. यावर संजय राऊत यांनी भाष्य करत आपले म्हणणे स्पष्ट केले आहे. बेळगावमध्ये ६० ते ६५ टक्के मराठी बांधव आहेत आणि ती संख्या कायम आहे. फक्त कर्नाटकने राजकीय स्वार्थसाठी त्या संपूर्ण भागाचे कानडीकरण करून मराठी टक्का कमी करण्याचा प्रयत्न केला. तरीही सीमाभागातील बहुमत हे मराठी आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
ठाकरे सरकार गप्प का बसलेय हे मला कळत नाही
बेळगाव महापालिकेत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला असला तरीही मराठी उमेदवारांना पडलेली मते भाजपपेक्षा अधिक आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेला भाजप सत्तेवर आला आहे. मराठी भाषिक अल्पसंख्याक आहेत, असे म्हणत असतील तर ते अत्यंत खोटे आहे. याच्यामागे काहीतरी डाव आहे. महाराष्ट्र सरकारने यावर भूमिका घ्यायला हवी. राज्य सरकार गप्प का बसले आहे, हे मला कळत नाही. राज्य सरकारने सीमाभागासाठी दोन मंत्री नेमले आहेत. या दोन्ही मंत्र्यांनी तात्काळ तिथे जाऊन चर्चा करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारला त्या संदर्भात पाऊल टाकावे, असे वाटत नसेल, तर हे दुर्दैव आहे. मुख्यमंत्र्यांशी या विषयावर बोलेन, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, कर्नाटक राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी भाषिक जनगणना करण्यात आली होती. त्या भाषिक जनगणनेत १५ टक्के मराठी भाषिक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. कर्नाटक सरकारने केलेल्या भाषिक जनगणनेचा या अजब निष्कर्षामुळे मराठी भाषिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तत्पूर्वी, बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा मात्र मोठा पराभव झाला असून, अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले.