मुंबई: राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने अटक केली. यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे. यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यासंदर्भात बोलताना संपूर्ण देश आणि देशातील जनता पाहतेय. केंद्रीय तपास यंत्रणा सूडबुद्धीनेच कारवाई करत असल्याचे ते म्हणाले.
केंद्रीय तपास यंत्रणांची ही कारवाई सूडबुद्धीनेच केली जात आहे. आणि अशा प्रकारे कारवाई केली असेल, तर त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह कॅबिनेटची बैठक होणार असेल, तर त्यात चुकीचे काय आहे, असा प्रतिप्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कायदेशीर आणि राजकीय लढाई आम्ही लढू
विरोधी पक्ष भाजपकडून आता नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे, यासंदर्भात संजय राऊत यांना विचारणा केली असता, विरोधी पक्ष अशी मागणी करत असेल, तर करू द्या. विरोधकांनी कितीही मागणी केली तरी राज्याचे प्रमुखच याबाबत अंतिम निर्णय घेतील. तसेच आता न्यायालयात कोणत्या प्रकारचे पुरावे सादर केले जातायत, हेही समजेल. याशिवाय राजकीय सूडाची भावना त्यामागे आहे, असा पुनरुच्चार करत महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये काय चाललेय, हे संपूर्ण देश आणि देशातील जनता पाहत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कायदेशीर आणि राजकीय लढाई लढू, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांना अटक झाल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. ईडी कार्यालयाबाहेर तणाव वाढला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची अंडरवर्ल्ड कनेक्शन प्रकरणात चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी याप्रकरणात एनआयए आणि ईडीकडून मुंबईत संयुक्तपणे छापे टाकण्यात आले होते.