Join us

Rajya Sabha Election 2022: “...तर आम्ही विरोध करण्याचे कारण नाही”; MIM च्या भूमिकेवर संजय राऊत स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 10:06 AM

Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीत चुरस असल्याचा भ्रम विरोधकांकडून निर्माण केला जात असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2022) मतदान पार पडत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आपापल्या उमेदवारासाठी मोठी चुरस असल्याचे पाहायला मिळत आहे. सर्व पक्षीय आपापल्या आमदारांना घेऊन विधिमंडळात पोहोचले आहेत. राज्यसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरु होण्याच्या अवघे काही तास आधी एमआयएम पक्षाने आपली भूमिका जाहीर करत महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याचे स्पष्ट केले. यानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देताना, एमआयएमशी मतभेद असले तरी महाविकास आघाडीला मतदान करणार असतील तर आम्हाला विरोध करण्याचे कारण नाही, असे म्हटले आहे. 

पाठिंबा मागायचाच असेल, तर तो उघडपणे मागा. आमच्या मतदारसंघातील विकासकामं होत असतील, तर आम्ही पाठिंबा देऊ, अशी भूमिका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी घेतली होती. त्यानंतर इम्तियाज जलील यांनी एमआयएमचे दोन्ही आमदार महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात इम्पियाज जलील यांनी ट्विट केले असून, भाजपचा पराभव करण्यासाठी आमचा पक्ष एमआयएमने राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमच्या महाराष्ट्रातील दोन्ही आमदारांना कॉंग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करण्यास सांगितले असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना, संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. 

महाविकास आघाडीचे सर्व उमेवार निवडून येतील

महाविकास आघाडीचे सर्व उमेवार निवडून येतील, असा विश्वास पुन्हा एकदा संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच राज्यसभा निवडणुकीत चुरस वगैरे काही नाही. विरोधकांकडून तसा भ्रम निर्माण केला जात असल्याचा दावाही राऊतांनी यावेळी केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला १६९ आमदारांचा पाठिंबा आहे. आजच्या मतदानात आकडे स्पष्ट दिसतील. महाविकास आघाडीकडील आकडे जास्त झाले तरी भाजपला धक्का बसू नये, अशी अपेक्षा आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. 

आम्हाला विरोध करण्याचे कारण नाही

एमआयएमने महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याचे समजले. भाजपला पराभूत करण्यासाठी त्यांनी ही भूमिका घेतली आहे. आम्हीही अनेक विषयांवर भूमिका घेतल्या आहेत.  एमआयएमशी शिवसेनेचे असलेले मतभेद कायम राहणार. मात्र, ते काँग्रेसला मतदान करणार असल्याने काँग्रेसशी त्यांचे एखाद्या विषयावर काही जुळले असेल, तर आम्हाला विरोध करण्याचे कारण नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच ज्यांचा जेवढा कोटा बैठकीत ठरला आहे, त्याप्रमाणे मतदान होणार आहे. गणित पूर्णपणे जुळवलेले आहेत. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. शरद पवारांशी चर्चा केली. प्रत्येक पक्ष एकमेकांना मदतच करतायत. खेळीमेळीने निवडणूक लढवली जात आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :राज्यसभामहाविकास आघाडीसंजय राऊतइम्तियाज जलीलऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन