“महाराष्ट्रात कायद्याचं राज्य, गुन्हा केला तर कारवाई होते”; नितेश राणे अटकेसंबंधी राऊतांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 12:14 PM2021-12-27T12:14:24+5:302021-12-27T12:15:57+5:30

नितेश राणे अटकेसंदर्भात तेथील दोन पालकमंत्री बोलतील, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

shiv sena sanjay raut reaction over bjp nitesh rane arrest demand in sindhudurg | “महाराष्ट्रात कायद्याचं राज्य, गुन्हा केला तर कारवाई होते”; नितेश राणे अटकेसंबंधी राऊतांची प्रतिक्रिया

“महाराष्ट्रात कायद्याचं राज्य, गुन्हा केला तर कारवाई होते”; नितेश राणे अटकेसंबंधी राऊतांची प्रतिक्रिया

googlenewsNext

मुंबई: भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांना अटक होण्याची शक्यता आहे. यासाठी पोलिसांकडून गोवा ते मुंबी मोठी फिल्डिंग लावण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील जीवघेणा हल्ला नितेश राणे यांना भोवणार असल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कोणी गुन्हा केला तर कारवाई होते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

संजय राऊत यांनी नितेश राणेंच्या अटकेच्या मागणीवर मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. याविषयी अधिक माहिती नाही. ही कायदेशीर बाब आहे. मी बोलणे बरोबर नाही. तेथील दोन पालकमंत्री आहेत, ते बोलतील. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कोणी काही गुन्हा केला तर कायद्याने कारवाई होते. पण माझ्याकडे जास्त माहिती नसल्याने त्याविषयी बोलणे योग्य नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

कोणावरही हल्ला करण्यात नितेश राणेंचे काही योगदान नाही

दुसरीकडे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी यासंदर्भात भाष्य केले असून, नितेश राणेंनी काय केले आहे? काही संबंध नसताना येणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्तारुढ लोकांचा पराभव होईल म्हणून सुडाच्या भावनेतून हा प्रकार सुरु आहे. गुन्हा दाखल केला आहे की नाही हे मला माहिती नाही. पण हे सुडाच्या राजकारणातून चाललेले आहे. नितेश राणे अज्ञातवासात नाहीत. अज्ञातवासात जाण्याची आम्हाला गरज नाही. ते आमदार आहेत. आम्ही अटक करणार अशा रितीने बातम्या दिल्या तर कोर्टात जावे लागेल. कोणावरही हल्ला करण्यात नितेश राणेंचे काही योगदान नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. 

नेमके प्रकरण काय?

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर मुख्य आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. सचिन सातपुतेच्या अटकेनंतर आता शिवसेनेने भाजप आमदार नितेश राणे यांना अटक करावी, अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे पोलिसांनी तिसऱ्यांदा नितेश राणे यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, नितेश राणे एकदाही चौकशीला आले नाहीत. पोलीस नितेश राणे यांच्या घरीही गेले होते. मात्र, नितेश राणे तेथेही उपस्थित नव्हते. मुंबईत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाला नितेश राणे यांनी हजेरी लावल्यास मुंबई पोलिसांच्या मदतीने नितेश राणे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाऊ शकते, असाही कयास बांधला जात आहे. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चार्टर्ड विमानातून नितेश राणे दिल्लीला जाऊ शकतात. त्यामुळे पोलिसांनी गोवा विमानतळाशी संपर्क साधून तिथूनही अटकेची तयारी केल्याचे म्हटले जात आहे. 
 

Web Title: shiv sena sanjay raut reaction over bjp nitesh rane arrest demand in sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.