Sanjay Raut “शिवसेनेत ही पद्धत नाही, एकनाथ शिंदेंचा कोणताही प्रस्ताव स्वीकारणार नाही”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 04:28 PM2022-06-21T16:28:49+5:302022-06-21T16:39:02+5:30
Shiv Sena Sanjay Raut reaction over Eknath Shinde revolt stand यामागे भाजपचे षड्यंत्र असून, बरेच दिवस जे ऑपरेशन लोटस सुरु होते. तर तो प्रकार सुरु केला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
मुंबई: शिवसेनेचे मंत्री आणि ठाण्यातील नेते बडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. त्यांच्यासोबत ३५ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये एक अपक्षही आमदार आहेत. शिंदे यांनी आपल्यासोबत यापैकी काही आमदारांना नेले आहेच, तसेच ठाण्यातील खास पदाधिकारीदेखील सूरतला गेले असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरूनही हटवण्यात आले आहे. शिवसेना आमदार, खासदार आणि पदाधिकारी यांची एक महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर झाली. यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या बैठकीबाबत माहिती दिली. शिवसेनेत प्रस्ताव देण्याची पद्धत नाही. एकनाथ शिंदे यांचा कोणताही प्रस्ताव स्वीकारला जाणार नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख, आमदार, खासदार मोठ्या प्रमाणात होते. हा प्रसंग निर्माण झालाय किंवा निर्णाम करण्यात आला आहे. यामागे भाजपचे षडयंत्र आहे. बरेच दिवस जे ऑपरेशन लोटस सुरु होते. तर तो प्रकार या लोकांनी सुरु केला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
एकनाथ शिंदेंचा कोणताही प्रस्ताव स्विकारणार नाही
एकनाथ शिंदेंची पक्षाच्या गटनेते पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. तसेच, एकनाथ शिंदेंनी दिलेला कोणताही प्रस्ताव शिवसेना स्विकारणार नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह झालेल्या शिवसेना नेते आणि आमदार, खासदारांच्या बैठकीत एकमताने ठरवण्यात आले आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे आमच्या सर्वांचे सहकारी आणि मित्र
एकनाथ शिंदे आमच्या सर्वांचे सहकारी आणि मित्र आहे. अनेक वर्ष आम्ही पक्षात काम केले. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंसोबत त्यांनी काम केले. त्यांचा गैरसमज दूर झाला असेल तर तो दूर केला जाईल. आम्ही त्यांना विनंती केली की मुंबईत या आणि चर्चा करा. आमच्या आमदारांना अपहरण करुन गुजरातला नेले नसते. गुजरात पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांच्या गराड्यात त्यांना ठेवले नसते. अनेक आमदारांनी तिथून सुटकेचा प्रयत्न केला. त्यांच्यावर दहशत आणि खूनी हल्ले झाल्याची माहिती मिळाली आहे. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांचे अपहरण करुन त्यांना सूरतमध्ये नेले आहे. अशा नऊ आमदारांना सूरतमध्ये नेल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार केली आहे. हे असेच सुरु राहिली तर मुंबई पोलिसांना कठोर ऍक्शन घ्यावी लागेल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.