Join us

“या अत्तराचा वापर करुन तुम्ही निवडणूक जिंकणार आहात”; संजय राऊतांचा PM मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 11:29 AM

सन २०१४ मध्ये महाराष्ट्रात अत्तराच्या बाटल्या कोण रिकाम्या करत होते, अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे.

मुंबई: उत्तर प्रदेशातील अत्तर व्यापारी पियूष जैन यांच्या घरावर टाकलेल्या छप्यातून सुमारे २५० कोटींहून अधिकची रोख रक्कम, अनेक किलो सोने-चांदी जप्त करण्यात आले. जप्त केलेली रोकड नेण्यासाठी कंटेनर मागवावा लागला. यानंतर याप्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. पियूष जैन छापेमारीवरून पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी नाव न घेता समाजवादी पार्टी आणि अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र, यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली असून, हमाम में सब नंगे होते है, असे सांगत याच अत्तराचा वापर करून तुम्ही निवडणूक जिंकणार आहात, या शब्दांत भाजपवर निशाणा साधला. 

राजकारणात आता सर्व प्रकारचे लोक अशाप्रकारचे महागडे अत्तर घरात ठेवतात. पण दुसऱ्यांच्या घरात सापडले की, अशा प्रकारचे वक्तव्य केले जाते. लखनऊ, कनौज, कानपूरमध्ये १८० कोटींचे कागदाचे अत्तर मिळाले आहे आणि त्याच्यावर राजकारण सुरु आहे. गोवा, पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये याच अत्तराचा वापर करुन तुम्ही निवडणूक जिंकणार आहात. तुम्ही कितीही अत्तर लावले तरी राजकारणात हमाम मे सब नंगे है, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

२०१४ मध्ये महाराष्ट्रात अत्तराच्या बाटल्या कोण रिकाम्या करत होते? 

आपल्या देशात अत्तराचेही राजकाराण होऊ शकते; इतका देश सांस्कृतिक दृष्ट्या महान झालेला आहे. उत्तर प्रदेशच्या एका व्यापाऱ्याकडे अत्तराच्या कमाईतून मिळालेले १८० कोटींचे घबाड सापडले. त्यामुळे देशात प्रत्येकाला वाटत आहे की आपण अत्तर विकायला हवे. आता ते अत्तर कोणाचे आणि इतके दिवस कोण अंगाला लावून राजकारण करत होते त्याच्यावर वास सुटला आहे. राजकारणामध्ये प्रत्येकाला आता अत्तराची गरज आहे. कोणी कितीही टीका केली तरी प्रत्येक जण त्या अत्तराच्या सुगंधाशिवाय राजकारण करु शकत नाही. २०१४ मध्ये महाराष्ट्रात अत्तराच्या बाटल्या कोण रिकाम्या करत होते, अशी विचारणा करत, सगळेच जण हे अत्तर लावून राजकारण करत असतात त्याबद्दल चर्चा न केलेली बरी, असे संजय राऊत म्हणाले. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती अतिशय तंदरुस्त आहे. मुख्यमंत्र्यांची प्रकृती आणखी सुधारत आहे. लवकरच ते पुन्हा कामकाज सांभाळतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. तसेच राज्याचे हिवाळी अधिवेशन अत्यंत चांगल्या पद्धतीने टोले देत, टोले घेत पार पडले. या अधिवेशनावर मुख्यमंत्र्यांचे चांगल्या प्रकारे लक्ष होते, असेही संजय राऊत म्हणाले.  

टॅग्स :संजय राऊतभाजपाउत्तर प्रदेश