“निसर्गरम्य गोवा भ्रष्टच, मलिकांनी सत्यकथन करून ‘झाकली मूठ’ उघड केली”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 02:00 PM2021-10-27T14:00:52+5:302021-10-27T14:01:58+5:30
गोव्याची परिस्थिती अशी गंभीर व बकाल झाली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
मुंबई: गोव्याचे तत्कालिन राज्यपाल आणि सध्याचे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांनी काल गोवा सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. यांनी गोव्यातील भाजप सरकारवर मोठे गंभीर आरोप केले आहेत. यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही सत्यपाल मलिक यांनी सत्यकथन केले असून, निसर्गरम्य गोवा भ्रष्ट असल्याची टीका केली आहे. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात झाल्यानंतर मलिक यांची २०१९ मध्ये गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली होती.
भाजपच्या विद्यमान राजवटीत गोव्यासारखे निसर्गरम्य राज्य भ्रष्ट आणि गलथान कारभाराच्या दलदलीत फसले आहे. गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ‘सत्य’ कथन करुन ही ‘झाकली मूठ’च आता उघड केली, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून या प्रकरणावर भाष्य केले आहे.
तरुण पिढी अमली पदार्थ, जुगाराच्या अधीन होत चाललीय
कायदा आणि सुव्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह गडद करणाऱ्या घटना गोव्यात सातत्याने घडत आहेत. तरुण पिढी अमली पदार्थ, जुगाराच्या अधीन होत चालली आहे. गोव्याची परिस्थिती अशी गंभीर व बकाल झाली आहे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत गोव्यातील प्रत्येक गाव स्वयंपूर्ण करणार, अशी थापेबाजी करीत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
गोव्यातील भाजप सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात सपशेल अपयशी ठरले असून, यावर मी ठाम आहे. गोवा सरकारने जे काही केले, त्यात मोठा भ्रष्टाचार होता. गोवा सरकारवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळेच मला राज्यपाल पदावरून हटवण्यात आले. मात्र, मी लोहियावादी आहे. चरण सिह यांचा सहवास मला लाभला आहे. कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचार सहन करणार नाही. गोवा सरकारने राबवलेली घर-घर रेशन ही योजना अव्यवहारी होती. एका कंपनीच्या सांगण्यावरून ही योजना राबवली गेली होती. या कंपनीने सरकारला पैसेही दिले. काँग्रेस नेत्यांसह अनेकांनी याबाबत चौकशी करण्याची विनंती मला केली होती. त्यानुसार चौकशी केली आणि त्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली, असे आरोप सत्यपाल मलिक यांनी केले होते.