मुंबई: एकीकडे पंजाबसह अन्य राज्यांच्या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली असून, दुसरीकडे मात्र अंतर्गत कलहामुळे काँग्रेसची आताची अवस्था बिकट होत चालल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद या ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून महत्त्वाची मागणी केली असतानाच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला मोठा सल्ला दिला आहे. नेतृत्वहीन झालेल्या काँग्रेसचा भारतीय जनता पार्टी फायदा घेत असून, अध्यक्षपदाचा विषय लवकर मार्गी लावावा, असे म्हटले आहे. (shiv sena sanjay raut suggest congress that party should appoint president as soon as possible)
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सल्ला दिला. काँग्रेसला अध्यक्ष हवा की, नको हा त्यांचा पक्षांतर्गत मुद्दा आहे. मात्र, काँग्रेस पक्ष देशातील सगळ्यात जुना पक्ष आहे. काँग्रेसने स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान दिले आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त काळ देशावर राज्य केले आहे. अनेक मोठे नेते दिले आहेत. अशा वेळी काँग्रेस पक्षाला अध्यक्ष नसणे याविषयी लोकांच्या मनात नक्कीच संभ्रम निर्माण होतो. राहुल गांधी, प्रियांका गांधी, सोनिया गांधी आहेत. तरीही काँग्रेसला अध्यक्ष नाही, जर कुणी तशी मागणी केली तर ती मागणी योग्य असेल की काँग्रेसचा अध्यक्ष कुठे आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
नेतृत्वहीन काँग्रेसचा फायदा भाजपा घेतेय
काँग्रेस पक्षाला एक अध्यक्ष नियुक्त केला जात नाही, तोपर्यंत जो काही गोंधळ सुरू आहे, तो थांबणार नाही. राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडल्यानंतर काँग्रेस नेतृत्वहीन झाल्याचे चित्र दिसत आहे. याचा फायदा भाजपासारखे पक्ष घेत आहेत. काँग्रेस देशातला प्रमुख विरोधी पक्ष आहे आणि तो राहील. भविष्यात राजकारण करताना काँग्रेसशिवाय राजकारण करता येणार नाही. अशा वेळी काँग्रेस नेतृत्वाने अध्यक्षपदाचा विषय लवकरात लवकर मार्गी लावला, तर नक्कीच देशाला विरोधी पक्षाच्या आघाडीला पुढे जाता येईल, असा सल्ला संजय राऊत यांनी यावेळी बोलताना दिला आहे.
काँग्रेसचे नेतृत्व म्हणजे गांधी परिवारच
वर्किंग कमिटी असे निर्णय घेत असते. काँग्रेसचे नेतृत्व म्हणजे गांधी परिवारच आहे. तरीही अध्यक्ष हवा. शिवसेना पक्षप्रमुख आमचे प्रमुख आहेत. आम्ही सगळेच काम करतो. पण नेते ते आहेत. त्या पदावर जो बसतो, तो पक्षाला दिशा देत असतो. असे कुणी असेल, तर त्यांच्या पक्षाला अजून गती मिळेल. भाजपा असो, काँग्रेस असो, शिवसेना असो किंवा इतर कोणता पक्ष असो. पक्षाचा मुख्य सेनापती असायलाच हवा, असेही राऊत म्हणाले.