“मंदिरांसाठी संघर्ष करण्यापेक्षा काश्मिरी पंडितांचे प्राण कसे वाचवता येतील हे पाहणं गरजेचं”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 01:33 PM2022-06-03T13:33:48+5:302022-06-03T13:34:53+5:30

इतर पक्षाच्या राजवटीत हे झाले असते तर भाजपने काश्मिरी पंडित, हिंहुत्वाच्या नावे संपूर्ण देशभर गोंधळ घातला असता, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

shiv sena sanjay raut support rss mohan bhagwat statement over gyanvapi mosque controversy and kashmiri pandits case | “मंदिरांसाठी संघर्ष करण्यापेक्षा काश्मिरी पंडितांचे प्राण कसे वाचवता येतील हे पाहणं गरजेचं”

“मंदिरांसाठी संघर्ष करण्यापेक्षा काश्मिरी पंडितांचे प्राण कसे वाचवता येतील हे पाहणं गरजेचं”

Next

मुंबई: आताच्या घडीला देशात विविध मुद्द्यांवरून राजकारण तापलेले दिसत आहे. ज्ञानवापी मशिदीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, यासंदर्भात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्ञानवापी प्रकरण श्रद्धेचा विषय असून न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी सांगितले आहे. तसेच प्रत्येक मशिदीत ‘शिवलिंग’ शोधण्याची, दरदिवशी नवा वाद निर्माण कऱण्याची गरज नाही, या शब्दांत मोहन भागवत यांनी कान टोचले आहेत. मोहन भागवत यांच्या या भूमिकेला शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पाठिंबा दिला असून, मंदिरांसाठी संघर्ष करण्याऐवजी काश्मिरी पंडितांचे प्राण कसे वाचवता येतील, हे पाहणे गरजेचे असल्याचे सांगत केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

मोहन भागवत बरोबर बोलले. मोहन भागवत यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. मंदिरांसाठी संघर्ष करण्यापेक्षा काश्मिरी पंडितांचे प्राण कसे वाचवता येतील हे पाहणे गरजेचे आहे. या देशात अनेक राज्यात आणि खासकरुन जम्मू काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित, तेथील नागरिक अत्यंत धोक्याखाली आहेत. घरात, कार्यालयात घुसून त्यांना रोज मारले जात आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. 

काश्मीरमधील स्थिती फार गंभीर आहे

काश्मीरमधील स्थिती फार गंभीर आहे. पण आज १९९० मध्ये होती तशीच स्थिती निर्माण झाली आहे. तुम्ही काश्मिरी पंडितांच्या घऱवापसीबद्दल सांगितलं होतं आणि त्यावर हिंदुत्वाच्या नावे मतंही मिळवली होती. पण कलम ३७० हटवल्यानंरही काश्मिरी पंडित, तेथील जनतेच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. तसेच कश्मीर फाईल्स चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले. पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या कृपेने निर्मात्याने ४००, ५०० कोटी कमावले. पण काश्मिरी पंडितांच्या नशिबी पलायनच आहे. खरे तर आज जे पलायन सुरु आहे, हत्या सुरु आहेत त्यावर ‘काश्मीर फाईल्स २’ काढावा आणि यासाठी जबाबदार कोण हे समोर यावे, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. 

...तर भाजपने देशभर गोंधळ घातला असता

सरकारकडून सुरक्षेची कोणतीही व्यवस्था करण्याता आलेली नाही.  इतर पक्षाच्या राजवटीत हे झाले असते तर भाजपने काश्मिरी पंडित, हिंहुत्वाच्या नावे संपूर्ण देशभर गोंधळ घातला असता. पण गृहमंत्री, पंतप्रधान, जम्मू काश्मीरमध्ये राज्य तुमचे असतानाही काश्मिरी पंडित जीव गमावत आहेत किंवा पलायन करत आहेत हे भयानक आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, प्रत्येक मशिदीत शिवलिंगाचा शोध का घेता. देशावर आक्रमण केल्यानंतर इस्लामी राज्यकर्त्यांनी अनेक मंदिरे तोडली. मुळात हिंदू समाजाच्या मनोबलाचे खच्चीकरण करण्याचा तो प्रयत्न होता. हिंदूंना वाटते की, आता अशा स्थानांचा पुनरुद्धार व्हायला हवा; परंतु आताचे मुस्लीम हे आपल्याच पूर्वजांचे वंशज आहेत. ज्ञानवापीच्या मुद्द्यावर चर्चेतून मार्ग काढा. राम मंदिर आंदोलनात संघ सहभागी झाला होता; परंतु ९ नोव्हेंबर रोजी आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली. आता संघाला कुठलेही आंदोलन करायचे नाही. संघाचा कुणाच्याही पूजापद्धतीचा विरोध नाही; परंतु कुणीही दुसऱ्यांच्या धर्मपद्धतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करायला नको.  देशाला विश्वगुरू बनविण्याचा मार्ग एकता व समन्वयातून जातो. एकमेकांना धमक्या देणे दोन्ही धर्मांच्या लोकांनी टाळले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका मोहन भागवत यांनी मांडली.
 

Web Title: shiv sena sanjay raut support rss mohan bhagwat statement over gyanvapi mosque controversy and kashmiri pandits case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.