मुंबई: केंद्रीय तपास यंत्रणेकडून शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर धाडसत्र, छापे सुरू आहेत. केंद्र सरकारकडून महाविकास आघाडीचे सरकार पडण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे काही प्रमुख नेतेही येऊन मला भेटले. मात्र, भाजप नेत्यांची ही चाल आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही. महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्रात ठिणगी पडेल, असा इशारा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे.
मुंबई आयोजित विशेष पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ही पत्रकार परिषद आंतरराष्ट्रीय असून, शिवसेनेचे अनेक येथे माझ्यासोबत आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले अनेक नेते येथे उपस्थित आहेत. महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर ज्या पद्धतीने आक्रमण सुरू आहे, त्याविरोधात रणशिंग फुंकणे आवश्यक असून, शिवसेना भवनाच्या ऐतिहासिक वास्तूपासून सुरुवात करतोय, असे संजय राऊत यांनी नमूद केले.
...तर महाराष्ट्रात ठिणगी पडेल
नवी दिल्लीत असताना भाजपचे काही प्रमुख नेते मला भेटले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार लवकरच पडणार आहे. भाजपवाले रोज नवीन तारखा सांगतात, आता १० मार्चची तारीख दिली आहे. कुणाच्या जीवावर तारखा सांगतात. भाजप नेते म्हणतात की, एकतर राज्यात राष्ट्रपती राजवट लावली जाईल किंवा महाविकास आघाडीतील काही आमदार आमच्यासोबत घेऊन आमचे सरकार स्थापन केले जाईल. तुम्ही यामध्ये पडू नका. अन्यथा ईडी आणि अन्य केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाइट आणि फिक्स करतील, अशा आशयाची धमकी दिली. मात्र, याला मी सक्त विरोध केला. त्या दिवसानंतर माझ्या आणि माझ्या जवळच्या व्यक्तींवर ईडीने धाडी टाकण्यास सुरुवात केली, असा दावा संजय राऊत यांनी यावेळी बोलताना केला.
दरम्यान, शिवसेना आणि ठाकरे परिवारासह आनंद अडसूळ, रवींद्र वायकर, अनिल परब, भावना गवळी यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई सुरू केली. इतकेच नव्हे, तर महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या घरावरही छापेमारी केली. या सर्व प्रकार अतिशय निंदनीय असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.