मुंबई : मुंबई महापालिकेच्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने ‘करून दाखवलं’ ही टॅगलाइन वापरत मतदारांचे लक्ष वेधून घेतले होते. या वेळची शिवसेनेची टॅगलाइन आहे, ‘डिड यू नो?’. महापालिका आणि पक्षसंघटनेच्या माध्यमातून सेनेने गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीचे ‘इलेक्शन मार्केटिंग’ या टॅगलाइनच्या माध्यमातून केले जात आहे. ‘करून दाखवलं’ या टॅगलाइनची बरीच चर्चा झाली होती. विरोधकांकडून टीकाही झाली आणि त्यावर आधारित उपरोधिक जाहिराती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या निवडणुकीत केल्या होत्या. या वेळी ‘डिड यू नो?’वर अशीच टीका होऊ शकते. डिड यू नो, असा सवाल करीत मुख्यत्वे तरुण आणि सुशिक्षित मतदारांना आकर्षित करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न दिसतो. त्या दृष्टीने या टॅगलाइनचा प्रभावी वापर करून घेण्यात येणार आहे. संपूर्ण मुंबईसाठी सेनेने काय केले याच्या जाहिरातींचे फलक शहरात प्रमुख ठिकाणी लावण्यात येणार आहेत. त्याशिवाय, वॉर्डावॉर्डातील लहान-मोठ्या लोकोपयोगी कामांची जाहिरात नगरसेवकपदाचे उमेदवार करून घेणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)
शिवसेना म्हणतेय... ‘डिड यू नो?’
By admin | Published: January 14, 2017 4:36 AM