“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 04:18 PM2024-05-03T16:18:20+5:302024-05-03T16:19:18+5:30
Ravindra Waikar News: लोकसभेत लोकांचे प्रश्न मांडायला जाणार आहे. शेवटच्या बाकावर बसायला नाही, असे सांगत रवींद्र वायकर यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
Ravindra Waikar News: राजकारणात कधी कोणी शत्रू नसतो आणि कधी कुणी मित्र नसतो. त्यामुळे जे आता होईल, त्याचा सामना करायला पाहिजे. गेली ३५ वर्षे राजकारणात आहे. लढायचे आणि जिंकायचे एवढेच उद्दिष्ट आहे, असे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी म्हटले आहे.
उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. यानंतर पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात आल्यामुळे तुमचेच जुने सहकारी आता निवडणुकीला विरोधात रिंगणात असणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक सोपी जाईल की कठीण असेल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. कोणतीही निवडणूक सोपी या अर्थाने घ्यायची नसते. चार वेळा नगरसेवक आणि तीन वेळा आमदार झालो आहे. गेली ३५ वर्षे राजकारणात आहे. निवडून आल्यानंतर पहिल्या दिवसांपासून ३६५ दिवस अशी पाच वर्षे काम करतो. माझे काम बोलते. रवींद्र वायकर हा काम करणाचा ब्रँड आहे. केलेल्या कामाचा अनुभव आणि शिक्षण यातून जिंकायचे आहे, असे रवींद्र वायकर म्हणाले.
महापालिका असेल किंवा विधानसभेत मी कसे काम केले आहे, हे सर्वांसमोर आहे. आक्रमकपणे प्रश्न मांडून लोकांची कामे करून घेतो. लोकसभेतही लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी जातो, शेवटच्या बाकावर बसायला जात नाही, असे रवींद्र वायकर यांनी स्पष्ट केले. तसेच ठाकरे गटाकडून होणाऱ्या विरोधाबाबत बोलताना रवींद्र वायकर म्हणाले की, आपण जिंकता कसे येईल, याकडे लक्ष दिले आहे. कोण पराभव करतो आणि कोण नाही करत, यापेक्षा आपल्या विजयासाठी भर दिला पाहिजे.
दरम्यान, संजय निरुपम शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार आहेत. याबाबत बोलताना रवींद्र वायकर यांनी सांगितले की, कोणीही व्यक्ती सहभागी होते, तेव्हा ताकद वाढते. एक आणि एक असे दोनच होते किंवा तुमच्या भाषेत सांगायचे तर एक आणि एक असे अकरा होईल. त्यामुळे मला मतदान जास्त होईल. उत्तर भारतीयांचीही मते आणि सहकार्य १०० टक्के मिळेल, असा विश्वास रवींद्र वायकर यांनी व्यक्त केला.