Join us

“PM नरेंद्र मोदी अन् शरद पवार चांगले मित्र, अजितदादा मनधरणी करण्यास यशस्वी झाले तर...”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 5:45 PM

Sharad Pawar And Ajit Pawar: सलग दुसऱ्या दिवशी अजित पवार गटाचे मंत्री आणि नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

Sharad Pawar And Ajit Pawar: एकीकडे महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे नेते आणि मंत्र्यांनी शरद पवार यांची सलग दुसऱ्या दिवशी भेट घेतल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार गट सातत्याने शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, यावर शरद पवार यांच्याकडून कोणताही प्रतिक्रिया आलेली नाही. यातच आता राजकीय वर्तुळात या भेटींबाबत प्रतिक्रिया उमटत असून, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी यांनी यावर भाष्य केले.

शरद पवार जेष्ठ नेते आहेत. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आमदार गेले असतील तर त्यात वाईट काय आहे. राष्ट्रवादीचे मनोमिलन व्हावे ही आमची इच्छा आहे. मोदी साहेब आणि पवार साहेब चांगले मित्र आहेत, महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी दोघांनी एकत्र यावे ही इच्छा आहे, असे दीपक केसरकर यांनी सांगितले. 

PM नरेंद्र मोदी अन् शरद पवार चांगले मित्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची जगाला गरज आहे. विशेषतः भारताला खूप गरज आहे. अशा परिस्थिती महाराष्ट्राला आणि देशाला शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून मार्गदर्शन मिळणे खूप आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट राजकारण म्हणून पाहता येत नाही. अनुभव, महाराष्ट्रासाठी काहीही करण्याची तयारी, महाराष्ट्राबाबत असलेले प्रचंड ज्ञान या सगळ्याचा फायदा सत्तेत असताना लोकांना देता येतो. शरद पवार यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले होते, तेव्हा शरद पवार यांचा उल्लेख गुरु म्हणून केला होता. कारण गुजरातमध्ये प्रचंड मोठा भूकंप झाला होता, तेव्हा खूप महत्त्वाची कामगिरी शरद पवार यांनी केली होती. त्यामुळे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हेच संबंध लक्षात घेता, त्यांच्या कार्यकर्त्यांचा हट्ट ते मान्य करतील, अशी देवाकडे प्रार्थना आहे, असे केसरकर यांनी नमूद केले. 

दरम्यान, अजित पवार गट शरद पवार यांची मनधरणी करण्यात यशस्वी झाले तर स्वागत करणार का, असा प्रश्न दीपक केसरकर यांना करण्यात आला. यावर, अशा प्रकारे मनधरणी करण्यात यश आले, तर आम्हाला आनंद होईल. एकमेकांबाबत राजकीय विरोध असू शकतो. मात्र, शरद पवार यांचे ज्येष्ठत्व आणि अनुभव लक्षात घेता, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबाबत सर्वांना आदर आहे, असे केसरकर यांनी नमूद केले. 

 

टॅग्स :दीपक केसरकर शरद पवारअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना