Shiv Sena Shinde Group News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी आणि जागावाटप यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. जागावाटपावरून विरोधकांच्या इंडिया आघाडीत फूट पडली असून, महाविकास आघाडीत नेमके काय होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यातच शिवसेना शिंदे गट कमी जागा लढवण्यास तयार नसून, आम्ही भाजपाच्या दावणीला बांधलेलो नाही, या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व ४८ जागा जिंकण्याचा मानस महायुतीने बोलून दाखवला आहे. त्याप्रमाणे महायुतीतील पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. यातच काही सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाला आगामी लोकसभेच्या १२ जागा मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर शिवसेना शिंदे गटातील नेते गजानन कीर्तिकर यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे.
भाजपाच्या दावणीला बांधलेलो नाही, जास्त जागा लढवण्यावर ठाम
महायुतीचा लोकसभेचा फॅार्म्युला कुठून आला मला माहिती नाही. आमच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्हाला १२ जागांचा हा फॅार्म्युला मान्य नाही. २०१९ ला आम्ही २२ जागा लढलो होतो त्यात आम्ही ४ जागा हरलो. मग १२ जागा कशा घेणार. राष्ट्रवादी कॅाग्रेसला भाजप आणि शिवसेनेने आपल्या खात्यातील जागा द्याव्यात. आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही. आम्ही जास्त जागा लढवण्यावर ठाम आहोत, असे गजानन कीर्तिकर यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, राज्यसभेवर राज्यातील सहाही उमेदवारांसह राजस्थानमधून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, गुजरातमधून भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, मध्य प्रदेशमधून केंद्रीय मंत्री एल. मुरुगन, ओडिशातून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह ४१ उमेदवार बिनविरोध निवडून आले. महाराष्ट्रातून बिनविरोध निवडून आलेल्या सहा जणांमध्ये अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, मिलिंद देवरा, प्रफुल्ल पटेल, चंद्रकांत हंडोरे यांचा समावेश आहे.