“...तर राज ठाकरेंना माफ केले जाणार नाही, गंगामातेचा अपमान, ६० कोटी भाविक...”; कुणी केली टीका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 09:10 IST2025-03-10T09:08:17+5:302025-03-10T09:10:12+5:30

Shiv Sena Shinde Group Sanjay Nirupam News: राज ठाकरे हे त्यांच्या भूमिका बदलण्याबाबत प्रसिद्ध आहेत. आता राज ठाकरे सनातन धर्माविरोधात जाणार आहेत का, असा सवाल करण्यात आला आहे.

shiv sena shinde group leader sanjay nirupam criticized mns chief raj thackeray over statement on maha kumbha mela 2025 | “...तर राज ठाकरेंना माफ केले जाणार नाही, गंगामातेचा अपमान, ६० कोटी भाविक...”; कुणी केली टीका?

“...तर राज ठाकरेंना माफ केले जाणार नाही, गंगामातेचा अपमान, ६० कोटी भाविक...”; कुणी केली टीका?

Shiv Sena Shinde Group Sanjay Nirupam News: कुंभमेळ्याला जाऊन आल्यावर बाळा नांदगावकर यांनी मला कमंडलूमधील पाणी दिले. ते म्हणाले, पिणार का? मी नाही म्हटले. देशातील एकही नदी स्वच्छ नाही, तरीही आम्ही नदीला माता म्हणतो. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही, असे परखड मत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, शिवेसना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 

अलीकडेच १४४ वर्षांनंतर येणाऱ्या महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. १३ जानेवारी २०२५ पासून ४५ दिवस सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात ६६.२१ कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले. या महाकुंभाने अनेक जागतिक विक्रमांना गवसणी घातली असून, याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही घेण्यात आली. या महाकुंभमेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून विविध पक्षांचे राजकीय नेते, दिग्गज मंडळी, सेलिब्रिटींनी आवर्जून सहभागी होत गंगास्नान केले. परंतु, यावरून आता राज ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

राज ठाकरे आता हिंदूविरोधी होणार आहेत का?

संजय निरुपम यांनी राज ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना जोरदार निशाणा साधला. संजय निरुपम म्हणाले की, राज ठाकरे यांच्या विधानानंतर मला प्रश्न पडतोय की, मनसे प्रमुख आता पूर्णपणे सनातनविरोधी झाले आहेत का? जगभरातील ६० कोटींहून अधिक हिंदू आणि सनातन धर्मावर श्रद्धा असणाऱ्या भाविकांनी महाकुंभमेळ्यात सहभागी होत पवित्र गंगास्नान केले. अनेक अडचणींवर मात करत महाकुंभमेळ्याला गेले. अशा परिस्थितीत राज ठाकरे म्हणतात की, गंगा नदी अपवित्र झाली आहे. हा गंगामातेचा अपमान आहे, अशी टीका निरुपम यांनी केली.

दरम्यान, राज ठाकरे हे त्यांच्या भूमिका बदलण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. राज ठाकरे अनेकदा कोणत्या पक्षाच्या बाजूने उभे राहायचे हे निवडणुकीच्या वेळी ठरवतात. सनातन धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची थट्टा केली जात आहे. माझ्या मनात एक प्रश्न उद्भवतो की, येत्या काळात राज ठाकरे हिंदुत्वविरोधी होणार आहे का आणि दुसऱ्या कोणत्या ग्रुपसोबत युती करून निवडणुका लढवण्याची तयारी करत आहे का? गंगा माता आणि सनातन धर्माचा अपमान करू नका, अन्यथा ही सनातन धर्मावर विश्वास ठेवणारे तुम्हाला माफ करणार नाही, असा हल्लाबोल निरुपम यांनी केला.

 

Web Title: shiv sena shinde group leader sanjay nirupam criticized mns chief raj thackeray over statement on maha kumbha mela 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.