Maharashtra Politics: “संजय राऊतांवर कारवाई करून अटक करावी”; अब्दुल सत्तार यांनी केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 03:12 PM2023-03-01T15:12:29+5:302023-03-01T15:14:35+5:30
Maharashtra News: भविष्यात याचे परिणाम चांगले होणार नाही, असा इशाराही अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.
Maharashtra Politics: विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात जोरदार घमासान झालेले पाहायला मिळाले. शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे सदस्य आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यातच आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी संजय राऊतांवर टीका करत अटक करावी, अशी मागणी केली आहे.
विधिमंडळ हे तर 'चोर'मंडळ आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केल्याने याचे पडसाद आता विधिमंडळात उमटताना पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना गट आणि भाजपच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राऊतांच्या वक्तव्यावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ सुरु झाला. विधिमंडळात सुरु असलेल्या गोंधळानंतर सभागृह दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. यानंतर अब्दुल सत्तार यांनी संजय राऊतांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
संजय राऊतांवर कारवाई करून अटक करावी
खरे म्हणजे आमचे दुर्दैव आहे की, ज्या माणसाला आम्ही मतदान करून राज्यसभेवर पाठवले, त्या माणसानेच असे विधान केले आहे. या सभागृहामुळे या माणसाला अनेक वर्षे राजकारण करायची संधी मिळाली. त्यांनी केलेल्या विधानाचा तीव्र शब्दांत आमच्या सर्व सदस्यांनी, आमदारांनी दोन्ही सभागृहात समाचार घेतला. संजय राऊतांवर कारवाई करून अटक करावी. अन्यथा भविष्यात याचे परिणाम चांगले होणार नाही, असा इशाराही अब्दुल सत्तार यांनी दिला.
दरम्यान, संसदेत पक्षनेतेपदावरुन काढून टाकण्यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, टाकू द्या. बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट. चोरांचे मंडळ आहे, विधिमंडळ नाही चोरमंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरुन काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. अशी अनेक पदे आम्हाला पक्षाने, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिली. जी आम्ही ओवाळून टाकतो पक्षासाठी. आम्ही लफंगे नाही. पदे गेली तरी परत येतील, आमचा पक्ष महत्त्वाचा आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"