शिंदेसेनेतील मंत्र्यांनी केले गुजरातचे तोंडभरून कौतुक; म्हणाले, “महाराष्ट्रात तशा सुविधा...” 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 16:04 IST2025-02-18T16:01:43+5:302025-02-18T16:04:12+5:30

Shiv Sena Shinde Group Minister Pratap Sarnaik Gujarat Tour: पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुजरात दौरा करून तेथील परिवहन व्यवस्थांचा आढावा घेतल्याचे सांगितले जात आहे.

shiv sena shinde group minister pratap sarnaik praised gujarat gsrtc work and said study and improve the quality facilities of st bus services in maharashtra | शिंदेसेनेतील मंत्र्यांनी केले गुजरातचे तोंडभरून कौतुक; म्हणाले, “महाराष्ट्रात तशा सुविधा...” 

शिंदेसेनेतील मंत्र्यांनी केले गुजरातचे तोंडभरून कौतुक; म्हणाले, “महाराष्ट्रात तशा सुविधा...” 

Shiv Sena Shinde Group Minister Pratap Sarnaik Gujarat Tour: शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अलीकडेच गुजरात दौरा केला. महाराष्ट्रातील परिवहन सेवेच्या विकासाला गती आणि नवीन दिशा देण्यासाठी अभ्यास दौरा असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. प्रताप सरनाईक यांच्या या गुजरात दौऱ्याबाबतची माहिती समोर आली आहे. 

महाराष्ट्रातील एस.टी. परिवहन सेवेची गुणवत्ता आणि सुविधा सुधारण्यासाठी गुजरात दौऱ्यावर आलो असून, वडोदरा येथील एस.टी. बस आगाराला भेट दिली. या भेटीदरम्यान तिकीट घर, स्वच्छतागृह, चालक-कर्मचारी विश्रामगृह आणि बसमधील अत्याधुनिक सुविधांचा आढावा घेतला. गुजरातमधील सुव्यवस्थित आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर असलेल्या व्यवस्थेचा अभ्यास करून, महाराष्ट्रातील परिवहन व्यवस्थेत नाविन्यपूर्ण सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे. वाघोडिया येथील पॉड कार फॅक्टरीला भेट देऊन तेथील तंत्रज्ञान, उत्पादन प्रक्रिया आणि सुविधांची माहिती घेतली. पॉड कार ही स्वयंचलित आणि पर्यावरणपूरक वाहतुकीची प्रभावी संकल्पना असून, भविष्यात महाराष्ट्रात अशा सुविधा आणण्याचा मानस आहे, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. 

व्यापार आणि प्रवासी दळणवळणचा सुंदर मिलाफ 

बसस्थानक हे शहराचे मध्यवर्ती ठिकाण असते. किंबहुना ते मोक्याच्या ठिकाणी असते. त्यामुळे व्यापार- उदीम विकसित होतो, हे ओळखून गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसस्थानक परिसरामध्ये व्यावसायिक वापरासाठी ‘व्यापारी संकुल’ आणि त्यामधून येणाऱ्या महसुलाद्वारे प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेले ‘बसपोर्ट’ निर्माण करून एक प्रकारे व्यापार आणि प्रवासी दळणवळणचा सुंदर मिलाफ साधला आहे. गुजरात परिवहन महामंडळामार्फत चालवण्यात येणारी एकात्मिक नियंत्रण प्रणाली अत्यंत चांगली असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्येही अशा प्रकारची सुविधा असणे गरजेचे आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले. 

प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली बसपोर्टची पाहणी

गुजरातमधील अहमदाबाद व वडोदरा येथील बसपोर्टची सरनाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडाळाने पाहणी केली. प्रवाशांना बसस्थानकावर कोणकोणत्या सोयी-सुविधा दिल्या जातात, याबद्दलची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळात दिली. विशेष करून बसस्थानकावर विश्रांतीसाठी थांबणाऱ्या प्रवाशांना प्रशासनाने कमी दरात ‘प्रवासी विश्रांतीगृह’ उपलब्ध केले आहे, त्याचे सरनाईक यांनी कौतुक केले. तसेच गुजरात परिवहन महामंडळाच्या अत्याधुनिक बसची त्यांनी पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान गुजरातचे परिवहन मंत्री हर्ष संघवी यांच्यासोबतही सरनाईक यांची बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही राज्यांतील परिवहन सेवेबाबत चर्चा करण्यात आली. 

दरम्यान,  इतर राज्यात ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेत, त्यांना भेट देऊन त्या आपल्या राज्यात कशा अमलात आणता येतील, याचा अभ्यास करावा. जेणेकरून विविध ठिकाणच्या नाविन्यपूर्ण योजना राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना सांगितले होते. याचाच एक भाग म्हणून गुजरात राज्य मार्ग परिवहन सेवेमार्फत चालवल्या जाणाऱ्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेणे, तसेच त्यांच्या प्रादेशिक परिवहन व्यवस्थापनाचा अभ्यास करणे, त्याबरोबर कर्मचाऱ्यांसाठी राबवत असलेल्या प्रोत्साहन योजना जाणून घेण्यासाठी प्रताप सरनाईक यांच्या या दौऱ्याची आखणी केली होती. इतर राज्यातील परिवहन सेवांचा अभ्यास करून चांगल्या कल्पना आपल्या एसटी महामंडळामध्ये राबवणे शक्य आहे का, याची चाचपणी या दौऱ्याच्या निमित्ताने करण्यात आली.

 

Web Title: shiv sena shinde group minister pratap sarnaik praised gujarat gsrtc work and said study and improve the quality facilities of st bus services in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.