Join us  

“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 5:26 PM

Milind Deora News: यामिनी जाधव या फायटर आहेत. त्या नक्कीच निवडून येतील, असा विश्वास मिलिंद देवरा यांनी व्यक्त केला आहे.

Milind Deora News: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला एकामागून एक धक्के बसले. मुंबई काँग्रेसमधील मोठे नाव असलेले मिलिंद देवरा यांनी पक्षाला रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. मुंबईसह राज्यातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्प्यातील मतदान झाल्यानंतर मिलिंद देवरा यांनी यामिनी जाधव विजयी होतील, असा विश्वास व्यक्त करताना उद्धव ठाकरे यांच्यामुळे काँग्रेस पक्ष सोडावा लागला, असा मोठा गौप्यस्फोट मिलिंद देवरा यांनी केला.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव या फायटर आहेत. यामिनी जाधव नक्कीच निवडून येतील. याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला संधी दिली. राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले. महायुतीकडे पाच पांडव होते. या पाच पांडवांनी या ठिकाणी काम केलेले आहे. त्यापैकी एक मी आहे. गिरणी कामगारांचा प्रश्न जटील आहे. विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी न्याय देण्यासाठी काम करायचे आहे, असे मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे. 

मग जनतेला न्याय मिळणार कसा?

ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत निवडून येणार नाहीत. याआधी ते ते मोदी लाटेत निवडून आले. त्यांचा कुठलाही जनसंपर्क नाही. त्या भागात कधी फिरत नाहीत. लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी ते कुठलंही काम करत नाहीत. नागरिकांसाठी कोणतीही बैठक बोलावली नाही. नागरिकांच्या घरांच्या समस्येवर बैठक आयोजित केली नाही. त्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले नाही. मग जनतेला न्याय मिळणार कसा, अशी थेट विचारणा करत, काँग्रेस माझ्यासाठी भूतकाळ आहे. आता भविष्याकडे पाहायचे आहे. दक्षिण मुंबई देशातील सगळ्यात बेस्ट मतदारसंघ आहे. काँग्रेसमध्ये होतो तेव्हा पक्षनेतृत्वाला स्पष्टपणे सांगितले होते की, आपण ही जागा गमवायला नको. पण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर खूप जास्त दबाव टाकला. त्यामुळे मला बाहेर पडावे लागले. काँग्रेसला माझ्या शुभेच्छा, असे मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे. ते टीव्ही ९ शी बोलत होते. 

दरम्यान, मतदान धीम्या गतीने झाले असा आरोप करणे हे विरोधकांचे षडयंत्र आहे. आपला पराभव झाकण्यासाठी त्या पद्धतीचे वक्तव्य करत आहेत. दक्षिण मुंबईमध्ये यामिनी ताई निवडून येतील आणि मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय होईल, असेही मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४मुंबई