Join us

शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “माझे भाग्य आहे की...”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 1:17 PM

Rahul Shewale Meet Raj Thackeray: राज ठाकरे यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्याची निश्चितपणे अंमलबजावणी करेन, अशी ग्वाही राहुल शेवाळे यांनी दिली.

Rahul Shewale Meet Raj Thackeray: दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि खासदार राहुल शेवाळे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत उमेदवारी देण्यात आली आहे. अलीकडेच राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर राहुल शेवाळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान काय चर्चा झाली, याची माहिती राहुल शेवाळे यांनी पत्रकारांना दिली.

राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आणि आशिर्वाद घेण्यासाठी शिवतीर्थावर आलो होतो. राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. महायुतीचा उमेदवार म्हणून राज ठाकरे यांची भेट घेतली. दक्षिण मध्य मतदारसंघात राज ठाकरे यांचे वास्तव्य असणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. दुसरे माझे भाग्य आहे की, १८ वर्षांनंतर राज ठाकरे धनुष्यबाणावर मतदान करणार आहेत, असे राहुल शेवाळे यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या, त्याची अंमलबजावणी करणार

संदीप देशपांडे, सदा सरवणकर यांच्यासह अन्य मनसेचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. निवडणुकांचा प्रचार आणि अन्य काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्याची निश्चितपणे अंमलबजावणी करेन, अशी ग्वाही राहुल शेवाळे यांनी दिली. 

दरम्यान, राज ठाकरे यांनी महायुतीला दर्शवलेला पाठिंबा हाच एक प्रकारे प्रचार आहे. मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील रणनीती ठरवली जात आहे. समन्वयक असलेल्या संदीप देशपांडे यांच्याशी दक्षिण मध्य मतदारसंघासाठी प्रचाराचे स्वरुप, रुपरेषा काय असेल, याबाबतही चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली.

टॅग्स :राहुल शेवाळेशिवसेनालोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४