“वसंत मोरेंचे राजकारण किती वजन, मोठा पाठिंबा मिळेल असे नाही”; शिंदे गटातील नेत्याचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 10:33 AM2024-03-30T10:33:00+5:302024-03-30T10:34:55+5:30
Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: पुणे लोकसभा निवडणुकीत पाठिंबा मिळण्यासाठी वसंत मोरे धावपळ करताना दिसत असून, यावरून शिवसेना शिंदे गटातील नेत्याने खोचक टोला लगावला आहे.
Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: पुणे लोकसभा निवडणूक रंगतदार होणार असल्याची चर्चा सुरू आहे. भाजपाने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली असून, काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. मनसेला जय महाराष्ट्र करत बाहेर पडलेले वसंत मोरे निवडणूक लढवण्यावर ठाम असून, पाठिंबा मिळण्यासाठी वणवण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून शिंदे गटाने टोला लगावला आहे.
वसंत मोरे यांनी महाविकास आघाडीतील काही नेत्यांची भेट घेतली. मात्र, त्यांच्या हाती निराशा लागली. महाविकास आघाडीकडून वसंत मोरे यांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण अपेक्षाभंग झाला. यानंतर वसंत मोरे यांनी सकल मराठा समाजाचा बैठकीला उपस्थिती लावून तेथून पाठिंबा मिळतो का, याची चाचपणी केली. तसेच मनोज जरांगे यांची भेट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. यातच महाविकास आघाडीपासून फारकत घेत वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर वसंत मोरे यांनी लगबगीने प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. लवकरच याबाबत निर्णय होईल, असे आश्वासन प्रकाश आंबेडकर यांनी दिले. यावरून शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी खोचक टोला लगावला.
वसंत मोरेंचे राजकारण किती वजन, मोठा पाठिंबा मिळेल असे नाही
प्रत्येक उमेदवार जिंकण्याच्या उद्देशाने निवडणुकीत उतरतो. वसंत मोरे यांचे किती वजन, मी ही निवडणूक जिंकणार, असे ते कुठेही म्हणालेले नाही. निवडणूक एकेरी होऊ देणार नाही, एवढेच म्हणालेत. याचा अर्थ त्यांना ही निवडणूक लढायची आहे. यामध्ये काही गैर नाही. परंतु, वसंत मोरे यांना एवढा मोठा पाठिंबा मिळेल, असे वाटत नाही, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. तसेच श्रीनिवास पाटील यांनी सातारा येथून माघार घेतल्यामुळे तेथील लढत एकतर्फी होईल, असा अंदाज आहे. शरद पवार यांनी निवडणूक लढवणार नाही, असे सांगितले असले तरी, त्यावर किती विश्वास ठेवावा, हा विषय वेगळा आहे. या मतदारसंघात ज्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे, त्यापैकी कुणीही तुल्यबळ असल्याचे दिसत नाही. त्यामुळे ती जागा उदयनराजे जिंकतील याबाबत वाद नाही, असे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ज्या दिवशी वसंत मोरे रिंगणात उतरेल, त्या दिवशी पुणे लोकसभेच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंगत येईल. तेव्हा आपण निवडणूक कशी एकतर्फी होईल हे पाहू. इथे फक्त निवडणुका लढायच्या नाहीत, तर जिंकायच्याही आहेत. काही झाले तरी निवडणूक लढवणार अशी ठाम भूमिका वसंत मोरे यांनी घेतली आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार का, याबाबत वसंत मोरे यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही.