Maharashtra Politics: “मिलिंद नार्वेकर मातोश्रीच्या जवळचे होते, पण आता...”; शिंदे गटाच्या नेत्यांनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 04:24 PM2023-02-27T16:24:33+5:302023-02-27T16:25:10+5:30
Maharashtra News: देव करो त्यांची इच्छा पूर्ण होवो, असे सांगत सभागृहात आलेल्या मिलिंद नार्वेकर यांना शिंदे गटातील नेत्याने शुभेच्छा दिल्या.
Maharashtra Politics: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येणार आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्यात यंदाच्या अधिवेशनात शिंदे-ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. सभागृहात केवळ आमदारांना प्रवेश दिला जातो. मात्र असे असताना उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आणि विश्वासू मिलिंद नार्वेकर हे सभागृहात बसल्याचे पाहायला मिळाले. राज्यपालांचे अभिभाषण सुरू असताना नार्वेकर सभागृहात बसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना देव करो त्यांची इच्छा पूर्ण होवो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
अधिवेशन काळात सुरक्षा रक्षकांकडून चोख बंदोबस्त असतो. तरीही राज्यपालांचे अभिभाषण सुरू असताना नार्वेकर सभागृहात बसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. मात्र आदित्य ठाकरेंच्या ही चूक निदर्शनास यांनी मिलिंद नार्वेकरांना लक्षात आणून दिले. त्यानंतर मिलिंद नार्वेकर हे सभागृहाबाहेर गेले. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, मिलिंद नार्वेकर मातोश्रीच्या जवळचे होते. पण आता ते त्यांच्यापासून खूप दुरावले आहेत, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.
देव करो त्यांची इच्छा पूर्ण होवो
ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर आज सभागृहात बसले होते. देव करो त्यांची इच्छा पूर्ण होवो. अनेक वर्षापासून आमदार होण्याची त्यांची इच्छा आहे. पण उद्धव साहेबांनी त्यांना बनवले नाही. उद्धव ठाकरे यांचा चाणक्य म्हणून ते ओळखले जायचे. आता ते साईड ट्रॅक झाल्यासारखे वाटत आहेत. अर्थसंकल्पाशी त्यांचे देणेघेणे नाही. तरीही ते आले. राजकीय लोकांशी त्यांचे देणेघेणे आहे. निश्चितच ते त्यांचा मार्ग शोधत असतील, अशी खोचक टीका संजय शिरसाट यांनी केली.
दरम्यान, मिलिंद नार्वेकर सगळ्याच पक्षांच्या संपर्कात असतात. त्यांची सर्वांशी जवळीक आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे एकदम खास आहे. दरवर्षी गणपतीला देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी जातात. शिंदे साहेबांशीही त्यांचे खास आहे. शिंदेही दरवर्षी त्यांच्या घरी जातात. सर्व पक्षांशी नाते असलेला एकमेव कार्यकर्ता आहे मिलिंद नार्वेकर. ते काहीही करू शकतात हा कॉन्फिडन्स सर्वांनाच आहे. त्यामुळे ते कधी काय उडी घेतील सांगता येत नाही. उद्धव ठाकरे यांच्या ते जवळ आहेत असे वाटत नाही. त्यांनाही वाटतेय आपण आपला मार्ग बदलला पाहिजे, असे संजय शिरसाट म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"