Barsu Refinery Project: रत्नागिरीमधील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होऊ नये, यासाठी आंदोलन करण्यात आले होते. यातच आता आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने शिवसेना शिंदे गटाचे मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची मुंबईत भेट घेतली. याबाबत उदय सामंत यांनी बैठकीत नेमके काय झाले, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबत माहिती दिली. बारसू प्रश्नावर सरकार सकारात्मक प्रयत्न करत आहे. जनतेने सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन उदय सामंत यांनी केले.
उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू आहे. मातीचे परीक्षण प्रयोगशाळेत सुरू आहे. त्याच्या अहवालानंतर तेथे प्रकल्प होणार की नाही, याबाबत स्पष्टता येणार आहे. सरकारची चर्चा करायची तयारी नसती तर दुसऱ्या मंत्र्यांना पाठवू शकलो असतो. मात्र, पालकमंत्री म्हणून आंदोलनकर्त्यांना भेटलो. चांगल्या पद्धतीने चर्चा झाली, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
आंदोलनकर्ते आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक होणार
आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक व्हावी, अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊ, असे आश्वासन आंदोलकांना देण्यात आले आहे. सरकार जर चर्चा करण्याची तयारी दाखवत असेल तर आंदोलकांनी इगो न धरता चर्चा करावी. आंदोलन करणे, आक्रमक होणे हा लोकशाही पद्धतीने करण्यात येणाऱ्या आंदोलनाचा भाग आहे, त्याविषयी काही म्हणणे नाही, असे उदय सामंत यांनी सांगितले.
दरम्यान, रिफायनरी प्रकल्प झाल्यास उदय सामंत यांना मतदान करणार नाही, अशी भूमिका आंदोलकांची आहे. याबाबत बोलताना, मूळात तो माझा मतदारसंघ नाही. मी रत्नागिरी मतदारसंघातून निवडणूक लढतो. जनतेवर माझा विश्वास आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.