मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. राज यांच्या भूमिकेला भाजपने एकप्रकारे समर्थनच केलं आहे. त्यामुळे, मनसे विरुद्ध शिवसेना आणि शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यात चांगलाच सामना पाहायला मिळत आहे. त्यातच, आगामी महापालिका निवडणुकांमुळे मुंबईतील महत्त्वाचे राजकीय पक्ष सक्रीय झाले आहेत. त्यातून, भाजपच्या आज होत असलेल्या पोलखोल सभेपूर्वीच शिवसैनिकांनी राडा केला. कांदिवलीत शिवसेना शाखा प्रमुखांच्या नेतृत्वात ही तोडफोड करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची पोल खोल करण्यासाठी भाजपने कांदिवली येथे सभेचं आयोजन केलं आहे. कांदिवली पूर्वमध्ये रेल्वे स्टेशनच्या समोर संध्याकाळी 7 वाजता ही सभा होणार आहे. त्यासाठी मध्यरात्रीपासूनच स्टेज बांधण्याचे काम सुरू होते. मात्र, रात्री एकच्या सुमारास मोठ्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी जमा झाले आणि भाजपच्या सभेच्या स्टेजची तोडफोड करुन ते बाजूला ठेवलं. येथील शाखाप्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी ही तोडफोड केली, तसेच शिवसेना झिंदाबादच्या घोषणाही दिल्याचे समजते.
कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आज ही पोल खोल सभा आयोजित केली आहे. या सभेला भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार प्रमुख प्रवक्ते असणार आहेत. शिवाय इतर भाजप नेत्यांचीही भाषणं होणार आहेत. परंतु शिवसैनिकांनी व्यासपीठाची तोडफोड केल्यानंतर आता त्याठिकाणी सभा होणार का? स्टेज पुन्हा उभारण्यात येणार आहे का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच येथील स्थानिक समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. मात्र, शिवसैनिकांनी मध्य रात्रीपासून भाजपच्या सभेचं स्टेज बांधण्याचं काम थांबवून ठेवल्याने परिसरात तणावाचं वातावरण आहे. म्हणूनच, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.