Join us

Shiv Sena: मुंबईत शिवसेनेच्या तटबंदीलाही तडे, सदा सरवणकर, कुडाळकर झाले बंडोबा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 11:30 AM

Shiv Sena: राज्यभरातील शिवसेना आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतला असला, तरी मुंबईतील शिवसेनेची तटबंदी शाबूत होती, मात्र गुरुवारी त्यालाही तडे गेले.

मुंबई : राज्यभरातील शिवसेना आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतला असला, तरी मुंबईतील शिवसेनेची तटबंदी शाबूत होती, मात्र गुरुवारी त्यालाही तडे गेले. सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे हे मुंबईतील आमदार गुवाहाटीतील बंडोबांच्या तंबूत दाखल झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडापासून मुंबईतील आमदार लांब होते. मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे वगळता अन्य कोणताच आमदार शिंदे यांच्यासोबत गेले नाही. त्यामुळे मुंबईत शिवसेना शाबूत आहे. पक्षाला इथे कोणताच धोका नसल्याचे मानले जात होते, मात्र गुरुवार उजाडताच मुंबईत पडझड झाल्याच्या वृत्ताने शिवसेनेत खळबळ माजली. दादर-माहिमचे आमदार सदा सरवणकर, कुर्ल्याचे मंगेश कुडाळकर आणि चांदिवलीचे दिलीप लांडे हे ही बंडात सामील झाल्याचे वृत्त धडकल्याने खळबळ माजली. त्यानंतर थोड्याच वेळात सरवणकर आणि कुडाळकरांचे व्हिडिओही दिसू लागले. विशेष म्हणजे, अगदी दोनच दिवसांपूर्वी सदा सरवणकर यांनी शिवसेना भवनासमोरील निदर्शनाचे नेतृत्व केले होते. बंडखोर आमदारांवर टीकाही केली, मात्र हेच सरवणकर दोनच दिवसांत गुवाहाटीला पोहोचले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

राज्यातील बंडाळीनंतर काहीशी संथ प्रतिक्रिया देणाऱ्या शिवसेना नेत्यांनी मुंबईत मात्र तातडीने हालचाली सुरू केल्या. खा. विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली विभागातील विविध आघाड्या, प्रमुख कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेण्यात आली. दादरने यापूर्वीही अशी गद्दारी पचवली आहे. यावेळीही शिवसेनेचे कार्यकर्ते या बंडखोरांना धडा शिकवतील, असा इशारा विनायक राऊत यांनी यावेळी दिला.

टॅग्स :शिवसेनामुंबईसदा सरवणकरमंगेश कुडाळकर