मुंबई - विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपा आमदार नितेश राणे आमने-सामने आले आहेत. दरम्यान, आज अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी नितेश राणेंनी शिवसेनेला हिंदुत्व आणि आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीवरून डिवचले. शिवसेना ही हिंदुत्ववादी आहे, सेक्युलर आहे की मधली आहे, हे शिवसेनेने स्पष्ट असा बोचरा सवाल नितेश राणेंनी विचारला. तसेच आदित्य ठाकरेंना नेमकी कुठल्या आवाजात धमकी आली, असा टोलाही त्यांनी लगावला.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य करताना नितेश राणे म्हणाले की, पहिलं शिवसेनेनं ठरवावं की ते हिंदुत्वाच्या बाजूने आहेत की, ते सेक्युलॅरिझमच्या बाजूने आहेत. कधी त्यांना सेक्युलॅरिझम पाहिजे असतो. कधी त्यांना धर्मनिरपेक्ष बनायचं असतं. तर कधी ते हिंदुत्वाच्या मागे जातात. अशा दोन्ही बाजूला लटकणाऱ्या लोकांना, मधल्या लोकांना समाजात काय म्हणतात याबाबत जरा विचार करा. शिवसेनेची भूमिका नेमकी कोणती याबाबत शिवसेनेनं, सामनाने भूमिका स्पष्ट करावी. बाकी मधले असतील तर त्यांचं काय करायचं ते आम्ही बघू, असा टोला निेश राणेंनी लगावला.
यावेळी आम्ही हिंदुत्वाच्या झेंडा घेऊन उभे आहोत, या शिवसेनेच्या विधानावरूनही नितेश राणेंनी टोला लगावला. ते म्हणाले की, शिवसेनेमध्ये हिंमत असेल तर त्यांनी हे विधान सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या तोंडावर जाऊन म्हणावं. जेव्हा शिवसेना असं विधान राहुल गांधी, सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या समोर म्हणून दाखवेल, तेव्हा आम्ही त्यांना मानू. बाकी सामनाच्या ऑफिसमधलं हिंदुत्व आम्हाला नको आहे, असेही नितेश राणे म्हणाले.
दरम्यान, आज आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीवरूनही नितेश राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला. आदित्य ठाकरेंना नेमकी कुठल्या आवाजात धमकी दिली हे विचारा. धमकी देण्यासारखं आदित्य ठाकरे नेमकं करतात काय? त्यांनी ७ आणि आठ वाजल्यानंतरच्या बैठका कमी कराव्यात, म्हणजे धमक्या कमी होतील, असा टोलाही नितेश राणेंनी लगावला.