शिवसेनेला 'मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर' रोग असावा, मनसेकडून आंदोलनाची खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 04:27 PM2019-07-17T16:27:42+5:302019-07-17T16:30:57+5:30
कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांची नावं जिल्ह्यातील शिवसैनिकांनी बँकाकडून मागवून घ्यावीत.
मुंबई - मनसेकडून शिवसेनेच्या आंदोलनाची खिल्ली उडविण्यात आली आहे. शिवसेनेला मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा रोग झाल्याची टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. मुंबईतील बीकेसी परिसरात शिवसेनेने पीक विमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढला आहे. या मोर्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसह शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत. त्यानंतर काही वेळातच संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन शिवसेनेच्या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे.
कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांची नावं जिल्ह्यातील शिवसैनिकांनी बँकाकडून मागवून घ्यावीत. शेतकऱ्यांनी मते दिली असतील तर त्यांना न्याय देण्याचं काम केलंच पाहिजे. शेतकऱ्यांचे रखडवलेले पैसे त्यांना 15 दिवसांत परत द्या, कारण आज शांत असलेला मोर्चा 15 दिवसानंतर बोलायला लागेल अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीक विमा कंपन्यांना आणि बँकांना इशारा दिला आहे. मुंबईतील बीकेसी परिसरात शिवसेनेने पीक विमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढला. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळवून देण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. मात्र, सेनेच्या या भूमिकेवरुन मनसेने शिवसेनेला चांगलाचा टोला लगावला.
शिवसेनेला मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा रोग झाला असावा. कारण, ते कधी सत्तेत असतात तर कधी विरोधात असतात, अशा शब्दात मनसेच्या देशपांडे यांनी शिवसेना आंदोलनाला लक्ष्य केलं आहे.
शिवसेनेला multiple personality disorder हा रोग झाला असावा कधी ते सत्तेत असतात तर कधी विरोधात असतात
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 17, 2019
दरम्यान, या आंदोलनावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मोठमोठे लोक चुना लावून देश सोडून गेले, माझा शेतकरी देह सोडून जातो. फसवाफसवी खूप झाली, 15 दिवसात मला शेतकऱ्यांची कर्जमाफीची नावे बँकांच्या दरवाजावर दिसली पाहिजेत. शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीचे पैसे अडकवून ठेवले असतील तर 15 दिवसांत त्यांना परत द्या हे मी हात जोडून सांगतो. शिवसैनिकांना आक्रमक व्हायला लावू नका अशा शब्दात उद्धव यांनी पीक विमा कंपन्या आणि बँकांना इशारा दिला आहे.