Join us

शिवसेनेने मला निष्ठा शिकवू नये - नारायण राणे

By admin | Published: April 15, 2015 2:28 PM

जनतेने विकासाऐवजी भावनेच्या मुद्द्यावर मतदान केले. जनतेला विकास नको असेल तर याला माझी तक्रार नसून जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे असे नारायण राणेंनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १५ - शिवसेनेमध्ये निष्ठावान म्हणजे काय ते आधी समजायला पाहिजे असं सांगताना जनतेच्या पैशावर टक्क्यांच्या राजकारणातून हे निष्ठावान असतात असा आरोप पुन्हा करताना शिवसेनेने मला निष्ठा शिकवू नये असे विधान पराभूत उमेदवार नारायण राणे यांनी केले आहे. तसेच जनतेने विकासाऐवजी भावनेच्या मुद्द्यावर मतदान केले. जनतेला विकास नको असेल तर याला माझी तक्रार नसून जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे असे नारायण राणेंनी म्हटले आहे. शिवसेना नेत्यांनी मला निष्ठा शिकवू नये असे सांगत राणेंनी शिवसेनेलाही प्रत्युत्तर दिले आहे. 

वांद्रे पोटनिवडणुकीतील पराभवानंतर नारायण राणेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मी गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात असून लोकशाहीत हार - जीत होत असते. निवडणूक जिंकण्यासाठीच लढतो. पण दुसरीकडे हार होण्याचीही शक्यता असते असे नारायण राणेंनी नमूद केले. माझ्या भविष्याचा निर्णय हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. मतदान करणारे मतदार व काँग्रेस कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसच्या नेत्यांनी राणे यांना पुरेसे पाठबळ दिले नसल्याची टीका चुकीची असल्याचे सांगताना राणे यांनी काँग्रेसच्या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांनी प्रचाराला हजेरी लावली होती असे नमूद केले आहे. भाजपाच्या गिरीष महाजनांनी राणे यांनी निवडणुकीत उभं राहून चूक केली होती असं सांगत राणे यांनी राजकारण सोडावं असा सल्ला दिला आहे. यावर बोलताना महाजन यांनी मला काय करावं हे शिकवू नये असं सांगत त्यांनी आपल्या औकतीत रहावं असा उलटहल्लाही राणेंनी केला आहे.