Join us

शिवसेनेने आधी ते सत्तेतून कधी बाहेर पडणार त्याची तारीख सांगावी - संजय निरुपम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 9:27 PM

शिवसेना भाजपला विचारते की राम मंदिर कधी होणार त्याची तारीख सांगा पण शिवसेनेने आधी ते सत्तेतून कधी बाहेर पडणार त्याची तारीख सांगावी, असे आव्हान मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिले.

मुंबई -  भाजपचा विरोध करण्यासाठी, भाजपवर सूड उगवण्यासाठी, भाजपची निंदा करण्यासाठी आणि फक्त भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेने राम मंदिरचा मुद्दा उचलून धरला आहे.  भाजपला डिवचण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला गेलेले आहेत. शिवसेना भाजपला विचारते की राम मंदिर कधी होणार त्याची तारीख सांगा पण शिवसेनेने आधी ते सत्तेतून कधी बाहेर पडणार त्याची तारीख सांगावी. किती वर्षे शिवसेनेचे मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरणार आहेत. राम मंदिर मुद्दा हा फक्त लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, मतांसाठी केलेली ही स्टंटबाजी आहे, अशी टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. 

ते पुढे म्हणाले की, शिवसेनेकडे गेली २२ वर्षे मुंबई महानगरपालिकेची सत्ता आहे. तरी ही मुंबईकरांना अजून मुबलक व शुद्ध पाणी नाही,चांगले रस्ते नाहीत, कचरा व्यवस्थापन चांगले नाही, पुरेसे डम्पिंग ग्राऊंड नाही, मुंबईकरांना मूलभूत सोयी सुविधा नाहीत. महाराष्ट्रात भाजप व शिवसेनेची सत्ता असून सुद्धा शेतकरी दाररोज आत्महत्या करत आहेत, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. दुष्काळग्रस्त भागांना पुरेशी मदत नाही, सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. असे अनेक गंभीर प्रश्न जनतेसमोर उभे आहेत ते सोडवायचे सोडून फक्त निवडणुकीसाठी शिवसेनेने राम मंदिरचा मुद्दा बाहेर काढला आहे. मुंबई व महाराष्ट्रातील गंभीर प्रश्न व समस्यांकडे या सरकारचे संपूर्ण दुर्लक्ष आहे, अशी माहिती संजय निरुपम यांनी दिली. 

टॅग्स :संजय निरुपम