“...तेव्हा अण्णा हजारे उठसूठ आंदोलने, उपोषणे करीत, ते भाजपचीच भाषा बोलतायत”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 09:46 AM2022-02-15T09:46:25+5:302022-02-15T09:47:58+5:30
अण्णा हजारे सोल्जर असून, चिनी सैनिकांची घुसखोरी आणि पुलवामा शहीदांबाबत मोदी सरकारला जाब का विचारला नाही, असे सवाल करण्यात आला आहे.
मुंबई: काही दिवसांपूर्वी राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने घेतलेल्या वाईन विक्रीच्या निर्णयावरून अद्यापही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. भाजपसह अन्य पक्षांनी यावर आक्षेप घेतला असून, ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. अलीकडेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी याविरोधात उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र, अण्णा हजारेंनी यानंतर माघार घेतली. या एकूण पार्श्वभूमीवर शिवसेनेने अण्णा हजारेंवर टीका केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातील अग्रलेखातून अण्णा हजारेंवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. काँग्रेसचे राज्य दिल्लीत व महाराष्ट्रात असताना अण्णा ऊठसूट उपोषणे व आंदोलने करीत. पण आता अण्णा हजारे भाजपचीच भाषा बोलतात. अण्णांचे वैफल्य हे आहे की, अण्णांच्या प्रत्येक आंदोलनातली हवा निघून गेली आहे व मोदी-शहांचे सरकार केंद्रात आल्यापासून त्यांना कोणी फारसे विचारत नाही. रामलीला मैदान, जंतर मंतरवर त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंग फुंकले, त्या रणशिंगात हवा फुंकणारे आज दिल्लीतील सत्ताधीश आहेत, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
आता जगायचे कशाला?
ज्या लोकपालसाठी अण्णांनी लढाई केली, तो लोकपाल आजही गुजरात राज्यात नेमला गेला नाही, दिल्ली तो बहोत दूर है! मी इतका मर मर मेलो, उपोषणे केली, पण कर्मदरिद्री भाजपवाले एक लोकपाल नेमायला तयार नाहीत. आता जगायचे कशाला? असा त्रागा खरे तर अण्णांनी करायला हवा होता, असेही यात म्हटले गेले आहे. याशिवाय, अण्णा हजारे यांचे मोठेपण महाराष्ट्रामुळे आहे. अण्णांनी राज्यात जलसंधारण, ग्राम सुधारणेची कामे केली. त्याची तोडीची कामे बाजूच्या पोपटराव पवार यांनी केली. त्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पण त्यांनी कधी महाराष्ट्रात जगायची इच्छा नाही, असे म्हटले नाही. उलट महाराष्ट्रा जन्मास येण्यास भाग्य लागते. ज्यांना महाराष्ट्रात जगायची इच्छा नाही ते कर्मदरिद्रीच म्हणायला हवेत. वाईन विक्रीसंदर्भातील निर्णयानंतर अण्णा हजारे महाराष्ट्रावर कसल्या गुळण्या टाकत आहेत आणि कोणाच्या प्रेरणेने टाकत आहेत, हे त्यांनाच माहिती आहे, असे म्हटले आहे.
अण्णा म्हणतात मला जगायचे नाही
अण्णा म्हणतात मला जगायचे नाही. वयाची ८४ वर्षे झाली, खूप झाली. मी जगून घेतले. म्हणजे ते खूप जगून घेतल्याचा आनंद व्यक्त करत आहेत. राळेगणच्या यादवबाबाने तुम्हाला जेवढे आयुष्य दिले तेवढे तर जगावेच लागेल. पण त्यासाठी महाराष्ट्राची बदनामी का करता, अशी विचारणा सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
दरम्यान, अण्णा हजारे सैन्यातून निवृत्त झालेले सोल्जर आहेत. त्यामुळे अधुनमधून ते देशभक्तीचा बाणा दाखवत असतात. चिनी सैन्य लडाखमध्ये घुसले आहे व मोदी सरकार हतबलतेने पाहत आहे. ही हतबलता पाहून अण्णांमधला राष्ट्रभक्त जवान जागा होईल व केंद्र सरकारला सवाल विचारेल, असे वाटले होते. ज्या देशाच्या सीमा दुश्मनांनी पार केल्या ते पाहून जगावेसे वाटत नाही, असं खरेतर अण्णांनी म्हणायला हवं होतं. पुलवामात आपले ४० जवान सरकारच्या बेपर्वाईमुळे शहीद झाले. तेव्हाही अण्णांना आता जगायचे कशाला असा प्रश्न पडला नाही, अशी टीकाही करण्यात आली आहे.